वेर्णा येथे झोपड्यांत बस घुसून 4 ठार

0
7

>> चार जखमी, सुदैवाने एकटा बचावला, सर्व मजूर बिहारी

>> चालकाचे नियंत्रण सुटून अपघात

वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या मजुरांच्या झोपड्यांत घुसून झालेल्या अपघातात चार बिहारी मजूर ठार झाले. शनिवारी रात्री 11.30 वा. ही घटना घडली.

या अपघातात विनोद राजपूत (60), राजेंद्र महतो (60), रमेश मंडल (60), अनिल महातो (35) या बिहार येथील चार मजुरांचा मृत्यू झाला. तर अपघातात तर तुना कुमार (22), दिनेश महतो (25), सुरेश सिंग (25), राजेश कुमार (23) हे सर्व बिहार येथील मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान हा अपघात घडला.

या अपघाताच्यावेळी एकजण फोनवर बोलण्याठी झोपडीतून बाहेर गेल्याने तो बचावला. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षितपणे बचावले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसचालक भारत श्रीधर गोवेकर, तसेच ज्याने मजुरांना धोकादायक ठिकाणी झोपड्यांमध्ये वस्तीस ठेवले तो कंत्राटदार अब्दुल कदार राहणारा फोंडा, मूळ केरळ येथील तसेच सुपरवायझर मेहबूब शेख आणि बसमालक नदीम शेख कुर्टी फोंडा यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चालकाचा ताबा सुटला
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रोझ बर्गर कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी बसच्या (जीए 05 टी 4777) चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला.
वळणावर त्याने बस न वळवता थेट रस्त्याबाजूला उभारलेल्या झोपड्यांमध्ये घातली. यावेळी तीन झोपड्यांवरुन बस गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा इस्पितळात नेताना मृत्यू झाला. यात तसेच चारजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. या बसचा चालक अपघातावेळी दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात तोही जखमी झाल्याने त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या अपघातातून सुदैवाने बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप बचावल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. या औद्योगिक वसाहतीत चेंबरचे काम करण्यासाठी आलेल्या बिहारी नऊ मजुरांना कंत्राटदारांने येथे जवळच रस्त्याशेजारी तात्पुरत्या झोपड्या बांधून दिल्या होत्या. या मजुरांपैकी आठजण झोपड्यांत जेवून झोपले होते. तर रुबेंद्र हा मजूर फोनवर बोलण्यासाठी झोपडीतून बाहेर गेला होता. त्यामुळे तो सुदैवाने बचावला. चालक भारत श्रीधर गोवेकर (61, रा. कुठ्ठाळी) या अपघातात जखमी झाला असून त्याला मडगाव येथे उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पंचनामा करून जखमींना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले तर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आलेले आहेत.

तीन झोपड्या उद्ध्वस्त
या दुर्घटनेतून बचावलेल्या कामगारांनी, बसमुळे तीन झोपड्या उद्ध्वस्त झाल्या असल्याचे सांगितले. एकूण नऊ मजूर या झोपड्यात राहत होते. त्यातील आठजण झोपले होते व एकजण फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाहेर गेला होता अशी माहिती दिली.
महामार्गाच्या गटारांवर स्लॅब टाकण्याचे काम हे कामगार करत होते असे या मजुरांनी सांगितले. या अपघाताची माहिती वेर्णा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी धाऊन आले व बसचालकाला ताब्यात घेतले.

नातेवाईक दाखल होणार

अपघातात सापडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक दाखल होणार आहेत. तसेच चार जखमी मजुरांपैकी एकाची प्रकृती स्थिर झाल्याने त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एकाला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तर दोघांवर मडगाव येथे उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. बसचालकावर शस्त्रक्रिया केली असल्याने त्याला इस्पितळात ठेवण्यात आले आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेलसन कुलासो यांनी सांगितले. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कारवाई करणार ः मुख्यमंत्री

या अपघाताल जबाबदार असलेल्या बसचालक, तसेच मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यांच्यावर दुखापत करणे व मृत्यूस कारणीभूत ठरणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असून या कंत्राटदाराला तसेच उपकंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.