वृत्तपत्रीय लेखन आणि माझे अनुभव

0
799
  • मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर
    (म्हापसा)

वाचकांच्या पत्रांमध्ये केवढी जबरदस्त ताकद असते बघा ना! म्हणूनच तर बहुतेक चोखंदळ वाचक संपादकांचा अग्रलेख आणि वाचकांची पत्रं यांचा समाचार आधी घेताना दिसतात. परंतु या वृत्तपत्रीय पत्रांची दखल संबंधित सरकारी खात्याकडून कितीशी घेतली जाते हा एक संशोधनाचाच विषय आहे.

वृत्तपत्राशी पूर्वी वाचण्यापुरता येणारा संबंध पुढे माझ्या लेखनाच्या निमित्ताने दृढ होत गेला. माझ्या अनुभवावर आधारित ललित लेख लिहितानाच मनात खदखदणार्‍या समाजातील कित्येक न पटणार्‍या गोष्टींविषयी तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर त्याबद्दलची माझी मतं, विचारही पत्रांमधून लिहीत गेले.
वृत्तपत्रीय पत्रलेखन या प्रकाराची सर्वप्रथम सुरुवात केली ती ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रभाकर पाध्ये यांनी. नवशक्तीचे संपादक असताना ‘जनमनाचा कानोसा’ हे सदर त्यांनी सुरू केलं. त्यानंतर दि. वि. गोखले यांनी ही परंपरा महाराष्ट्र टाईम्समध्ये आणली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वसामान्य वाचक लिहिते झाले आणि आज विविध वृत्तपत्रांमध्ये ‘प्रतिसाद’, ‘वाचकांचे विचार’, ‘जनमत’, ‘वाचकमंच’, ‘विचारमंच’ अशी विविध शीर्षकं लेवून हे सदर वृत्तपत्राचा सर्वांत महत्त्वाचा स्तंभ बनून राहिलाय. सकाळच्या पहिल्या वाफाळल्या चहाच्या घोटाबरोबर जनमताचं खाद्य चघळल्याशिवाय चहा गोड लागतच नाही.

वृत्तपत्र हा जनमनाचा आरसा आहे. आपले विचार, समस्या, प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना, तक्रारी, मतं इत्यादी वृत्तपत्रातून मांडण्यास वाचकांना मिळालेले हे एक मुक्त व्यासपीठ आहे. वाचकांच्या नजरेसमोर नवा विषय, नवी माहिती किंवा नवा दृष्टिकोन ठेवणे हे पत्रलेखनाचं महत्त्वाचं प्रयोजन आहे. मात्र गार्‍हाण्यांचीच दाद लावून घेणं एवढाच पत्रलेखनाचा हेतू नसावा. वाचकांचं प्रबोधनही पत्रातून होेणं आवश्यक आहे, जे फार महत्त्वाचं आहे. याशिवाय आपलं नाव वाचकांसमोर यावं हा छुपा हेतूही असतोच. प्रसिद्धी कुणाला प्रिय नसते?
पत्रलेखनाला इतर लेखांप्रमाणे अलंकारिक भाषाशैलीची गरज नसते. आशयसंपन्नता आणि मुद्देसूदपणा हा पत्रलेखनाचा मुख्य गाभा आहे. प्रतिष्ठाप्राप्त वर्तमानपत्राला राजकारण्यांच्या मेजावर पहिलं स्थान असतं. त्यामुळे त्यामधील वाचकांच्या सूचना, तक्रारी, समस्या थेट संबंधित खात्याकडे तात्काळ पोचू शकतात आणि यातूनच जनहितयाचिका तयार होऊ शकते. एवढी ताकद पत्रलेखनात नक्कीच असते.

मुंबईमध्ये वर्षभरात सर्वाधिक पत्रलेखन करणार्‍या पत्रलेखकाचा गौरव करणारे वृत्तपत्रही आहे. इंग्लंडसारख्या देशात पत्रकाराला फार महत्त्व दिलं जातं. त्या देशात वाचकांच्या पत्रांचे संग्रह तयार करतात, ज्यामध्ये सांस्कृतिक इतिहासाचे धागेदोरे गुंतलेले असतात. पत्र हे खरं तर लेखच असतो. पत्र जेव्हा मुद्देसूद, अर्थगर्भित आणि अधिक लांबीची असतात तेव्हा त्यांना लेखाचं रूप प्राप्त होतं असा अनुभव येतो.
पत्रलेखनाचा माझा अनुभव मला वाटतं, इतरांपेक्षा वेगळा नसावा. बहुतेक लेखांवर वाचकांची खुशीपत्र येण्याचा गोड अनुभव लेखकांना येतच असतो. समाजामधील काही पारंपरिक प्रथांचं, विवेक सोडून अंधपणे, विशेषतः सुशिक्षितांकडून अनुकरण केलं जातं. (उदा. प्रसाद पाकळी लावणे, देवाच्या नावाने उपवास करून ‘एकादशी दुप्पट खाशी’ हा प्रकार करणे वगैरे वगैरे) तेव्हा मी खरोखरच अस्वस्थ होते. पण मी त्याविरुद्ध कोणतीही कृती करण्यास असमर्थ ठरते. अशावेळी माझी लेखणी मला साथ देते. अशा प्रथांविरुद्ध धाडसाने पुढे सरसावणार्‍या माझ्या लेखणीचं समविचारी व्यक्तींकडून केलेल्या कौतुकाचे शब्द कानावर पडले. तसंच असहमत असलेल्या नात्यातील बुजूर्गांच्या कानपिचक्याही ऐकाव्या लागल्या, ‘अंनिस’चे अध्यक्ष श्री. यज्ञेश्वर निगळे यांनी तर ‘मीराबाई, प्रसादपाकळी आणि कौल’ अशा शीर्षकाची भली मोठी प्रतिक्रियाही गोमन्तकमध्ये लिहिली. कारण सहसा स्त्री पारंपरिक धार्मिक कर्मकांडांच्या विरोधात असत नाही. त्यामुळे फोंड्याहूनही एक निवृत्त अधिकारी श्री. देसाई यांनीही पत्र पाठवून मला शाबासकी दिली होती. अशी अभिनंदनाची पत्रं ही माझ्यासारख्या उमेदवार लेखिकेला नक्कीच स्फूर्तिदायी, प्रेरणादायी ठरतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिचयाचं वलयही वाढलं, ही जमेची बाजू! अंधश्रद्धेच्या विरोधात ‘कीर्तनाद्वारे अंधश्रद्धेला खतपाणी नको’, ‘अंनिसचे विरोधक की गोंधळी’, ‘प्रबोधन करणे म्हणजे धर्मविरोधी कार्य नव्हे’ अशा शीर्षकांनी मी पत्रलेखन केलं होतं. त्यावर बराच उहापोह झाला. परंतु मी माझ्या मताशी ठामच राहिले. माझी पत्रं दोन टक्के वाचकांचं मतपरिवर्तन करू शकली तरी ते खूप समाधान देऊन जातं. एका कीर्तनकाराच्या पत्राला मी प्रत्युत्तर दिले तेव्हा वाचकांच्या पत्रोत्तरातून त्याला पुष्टीही मिळाली. तसेच विरोधी सूरही पत्रलेखनातून उमटले. अशाप्रकारे पत्रलेखनाद्वारे एखाद्या विषयावर विचारांचे आदान-प्रदान होते. पूर्वदूषितग्रह नष्ट होऊन विचारपरिवर्तन होऊ शकते. आपली मते किंवा विचार कसे चुकीचे होते याची जाणीवही अशा पत्रांमधून होते. थोडक्यात वाचकांच्या विचारांचे आदान-प्रदान, देवाण-घेवाण करवणारे हे सदर म्हणूनच वाचकप्रिय असते.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा वृत्तांत पत्रातून वाचकांपर्यंत पोचवणे हा माझा एकेकाळी छंद होता. ‘मधुरांगण’ आयोजित कार्यक्रम असो, माणिक वर्मांच्या कन्यांनी सादर केलेला ‘हसले मनी चांदणे’ असो, डॉ. अजय वैद्यनिर्मित ‘कोणे एके काळी’ असो वा अलका देव मारूलकर निर्मित ‘मदन – मोहिनी’ हा कार्यक्रम असो- अशा उत्कृष्टपणे सादर झालेल्या कार्यक्रमांची शाब्दिक झलक लिहून उपस्थित न राहू शकलेल्यांच्या मनाला थोड्या चुटपुटीचा चटकाही मी देई.

माझी पत्रं वाचून एक बुजूर्ग वाचक लिहितो- ‘सौ. मीरा प्रभूवेर्लेकर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीदार शब्द आणि वाक्यरचनेद्वारा कार्यक्रमाचा आस्वाद वाचकांना घरपोच केला याबद्दल त्यांना अनेक आशीर्वाद- एक वयोवृद्ध नाट्यप्रेमी, पणजी.’ एका बुजूर्गाचा आशीर्वाद आणि गोड पावती माझ्या पत्रलेखनाने मला मिळवून दिली. लेखनक्षेत्रात उतरलेल्या माझ्यासारख्या उमेदवारांसाठी अशी पत्र प्रेरणादायीच ठरतील नाही तर काय?
‘डॉ. सदाशिव देव यांचा विसर कसा पडला?’ या शीर्षकाच्या माझ्या पत्राने खुद्द तत्कालीन संपादकांनी दखल घेतल्याने, प्रसिद्धीपराङ्‌मुख आणि दुर्लक्षित राहिलेल्या एक विद्वान गणितज्ञाचा सत्कार केला गेला आणि डॉ. देवांनी त्यावेळी आमचा परिचय नसतानाही फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. अजून एक प्रसंग आठवला. माझे बालपणीचे शिक्षक रामदास फेणे यांच्याशी मी गोव्यात संपर्क साधू शकले ते, त्यांना वृत्तपत्रातून पत्राद्वारे केलेल्या अभिनंदनामुळेच! ते पत्र वाचून मी खाली दिलेल्या नंबरवर फोन करून माझ्याशी त्यांनी थेट संवाद साधला.

अशा माझ्या या पत्रलेखनातून मी काय काय मिळवलं आणि कमवलं हे माझं मीच जाणते. वाचकांच्या पत्रांमध्ये केवढी जबरदस्त ताकद असते बघा ना! म्हणूनच तर बहुतेक चोखंदळ वाचक संपादकांचा अग्रलेख आणि वाचकांची पत्रं यांचा समाचार आधी घेताना दिसतात. परंतु या वृत्तपत्रीय पत्रांची दखल संबंधित सरकारी खात्याकडून कितीशी घेतली जाते हा एक संशोधनाचाच विषय आहे. या पत्रांनाही ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा बाळगू!