वृक्षवल्ली

0
136
  •  मीना समुद्र

त्यासाठी धीर हवा, संयम हवा. असा धीर, असा संयम झाडे धरतात त्यामुळे विलक्षण सौंदर्याची खाण आपल्याला गवसते. फुलाफुलांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आरोग्याचा वरही!

झाडांची मोठी गंमत असते, मग ती मोठी असोत की छोटी. बागेत त्यांची देखभाल करण्यासाठी कुणी असल्याने ती जरा शिस्तीत रोपलेली, राखलेली, वाढवलेली आणि काळजीपूर्वक जतन केलेली असतात. रानावनात मात्र ती उंच उंच वाढलेली, तर कधी मनमुक्त आडवीतिडवी पसरलेली, गळ्यात गळा घातलेली किंवा कधी स्वतंत्र अस्तित्व जपणारी. ऋतुमानानुसार त्यांच्यातले बदल न्याहाळणार्‍याला ते दिसून येतात. एरव्ही कामाधामाच्या धकाधकीत त्यांच्याकडे लक्ष जातं ते ती फुलांचा बहर ओसंडून जाताना. रंगगंध उधळीत सामोरी आल्यावर आणि फळांनी झुकल्यावाकल्यावरच.

चैत्राच्या उन्हात ती मोठी आनंदी बहरलेली दिसतात. घरट्यांनी गजबजलेलीही. सतेज टवटवीत पानांनी आणि घवघवीत फुलांनी ती नटूनथटून बसतात तेव्हा अरसिकातलेही कवित्व जागे व्हावे! असे नवीन धुमारे! फळांची बालपावले आणि पंखांच्या येरझार्‍या! काही झाडांना ऊन मानवते तर काही झाडे सावलीतच खुशीत असतात. तरीही माती, पाणी, उजेड, वारा यांची आवश्यकता अन् लळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सार्‍यांनाच. वैशाखाच्या उन्हातही आणि त्याच्या असह्य झळातही काही वृक्षांचा झळाळ कायम राहतो. एवढेच नव्हे तर प्रखर उन्हातही ते मोठ्या निग्रहाने उभे असतात. ऊन अंगात भिनवून घेत ते आणखी आणखीच तजेलदार, तरारलेली, झगमगीत, वैभवी दिसतात. अग्निदिव्यातून पार पडलेली सीता आणखी आखणीच शुचिर्भूततेची मूर्त वाटावी, पावित्र्याच्या दिव्य तेजाने लखलखणारी वाटावी आणि त्या दिव्य तेजाने डोळे दिपून जावेत तसे काही वृक्ष-लतावेली या दिवसांत दिसतात. सावरी, गुलमोहर, बोगनवेल, मोगरा एवढीच उदाहरणं डोळ्यांसमोर आणली तरी पुरे! बागेतल्या मुद्दाम लावलेल्या बहुतेकांना रोज कमीजास्त जलपान हवेच. विशेषतः रोप वाढताना. काही तर इतकी सोसासोसाने पाणी पितात तर काहींच्या पायाशी (मुळाशी) पाणी ओथंबून राहते. अन् काही पावसाचे पाणी पोटी साठवून गुजराण करतात. एखाददुसरा दिवस पाणी तोडून माती चांगली तावूनसुलाखून निघाली आणि मग पाणी दिले तर ती तरारून उठतात. काही रोपांना रोज दोनदा पाणी दिले तरी चालते, नव्हे त्यांना आवडते उन्हाळ्यात.

परवा मात्र गंमतच झाली. शेजार्‍याने रोपवाटिकेतून आणलेले तगरीचे रोप कुंडीत रोपले. मग ८-१५ दिवस नियमित पाणी दिले. ऊन-सावली नीट मिळेल अशी ती कुंडी जागा बदलून ठेवली. ते आणले तेव्हा त्याच्या तकतकीत हिरव्यागार पानांवर असलेली पांढरीशुभ्र छोटी-छोटी फुले बरेच दिवस हसत राहिली. हे चांदणे बरेच दिवस तेवत राहिले आणि मग एकेकानं मातीत लोळण घेतली. त्यानंतरही १-२ वेळा त्या स्वस्तिकाच्या आकाराच्या चांदणफुलांनी लक्ष वेधून घेतले आणि नंतर नुसत्या हिरव्यागार पानांचाच साज ते रोपटे अंगावर मिरवीत उभे राहिले. त्या दरम्यान शेजारी गावाला गेला आणि त्याला यायला दोन दिवस जास्त अवधी लागला तर झाड एकदम पूर्ण सुकून गेले होते. कितीतरी दिवस पाण्याविना ठेवलेल्या रोपासारखी त्याची वाळूनकोळ स्थिती झाली होती. पण आणखी थोड्याच दिवसांत त्याचा एक दांडा मात्र हिरव्यागार पानांनी गजबजून गेलेला लक्षात आलं. कोणाची तरी वाट पाहात मरणशय्येवरच्या माणसाने प्राण शिल्लक ठेवावे तसे काहीसे वाटले. त्या हिरव्या डहाळीतून ती धुगधुगी, ती आशा आणि त्या रोपट्याची सृजनाची भाषा जाणवू लागली. आणि परवाच्या पावसात तर त्या रोपट्यावर एक इवलीशी कळीही उगवली. रोपाच्या प्राणज्योतीसारखी ती कळी आता फुलेल. एका पांढर्‍याशुभ्र तेजस चांदणीत तिचे रूपांतर होईल आणि वाळलेल्या रोपाची जीवनेच्छा त्या हिरव्या दांडोरीच्या अन् कळीच्या पाऊसथेंबाबरोबर सर्वांगाशी तरारून, बहरून उठेल.

कितीदातरी निसर्गाच्या सकारात्मकतेचा प्रत्यय असा ठायी ठायी येतो. दाहक असलेले दिव्य हाती धरले तरी ते जीवनासाठी शीतलता आणि प्रसन्नता देणारे, ऊर्जा देणारेही असते हे तो आपल्याला सतत जाणवून देत असतो. त्यासाठी धीर हवा, संयम हवा. असा धीर, असा संयम झाडे धरतात त्यामुळे विलक्षण सौंदर्याची खाण आपल्याला गवसते. फुलाफुलांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आरोग्याचा वरही! साधे गवताचे बी, तेही आपले सातत्य टिकविण्यासाठी जमिनीत स्वतःला खोल खोल गाडून घेते आणि पहिल्याच पावसानंतर आपल्या सार्‍या ऊर्जेनिशी चैतन्याचे हिरवे गाणे गात सरसरून तरारून मातीच्या उदरातून वर येते. त्याच्या अधूनमधून इवलीइवली रानफुले आपल्या कपाळा-गालाला तीट लावल्यासारखी खुलून दिसतात. आपल्या लोभस हसण्यानं ती सार्‍यांचं लक्ष वेधून घेतात. कुणी नाही पाहिलं तरी निळ्या आकाशाकडे टुकूटुकू पाहत वार्‍यावर डोलतात. चिमणचार्‍याचीही साथ असते त्याच्या डोलण्याला अन् थेंबांच्या पैंजणांची त्यांच्या नाचण्याला!
असे हे नुसते गवतच नव्हे तर किती प्रकारच्या वनस्पती उगवून येतात आपोआप या पाऊसकाळात. आघाडा, दुर्वा, टाकळा, तेरं यांचं बीज कुणी लावायला, रोपायला जात नाही. पाऊसथेंबातच यांची बीजं असल्यासारखे ते पावसाबरोबर उगवतात, पावसात हसतात, डोलतात, वाढतात आणि आपले सारे गुण माणसासाठी उपयोगात आणतात. शेवग्याचं नुसतं खोड उरलेलं असलं तरी पावसाच्या थेंबाथेंबाबरोबर ते अंग धरू लागतं, चांगलं बाळसं येतं आणि फुलांनी, शेंगांनी लहडून आपल्याला वरदान ठरतं. इकडे घरच्या खिडकीखाली ‘अहिल्या शिळा’ होऊन पडलेली ही गोकर्णी पावसाचे पाऊल लागताच कशी तरारून उठली आहे. आपल्या अस्तित्वाचे भान आल्यासारखी कोवळी-पोपटी गोलसर पाने ती अंगावर ल्याली आहे. आपला नाजूक देह झिम्मड पावसानं घुसळून जाऊ नये म्हणून खिडकीच्या लोखंडी गजाचा तिने आधार घेतला आहे. त्याला लडिवाळ विळखे घालत ती वर वर चढते आहे. गेल्या पावसाळ्यात तिने खिडकीच हिरव्या जाळीनं व्यापून टाकली होती. आता गतवर्षीसारखीच तिच्यावर गाईच्या कानाच्या आकाराच्या निळ्या सुंदर फुलांनी ती शोभून दिसेल. मला तर तिच्याकडे पाहताना वाटतं की इतकी फुलं हिच्या अंगावर कशी? चणीनं तशी नाजुकशी वेलण तर आहे. पण म्हणूनच या जीवट वेलीवर ती निळी फुले फुलली की मला वाटतं घननीळाची ती दुडदुडणारी पावलं तर नव्हेत? काही सांगता येत नाही झाडावेलींचे हे मात्र खरे!