विश्‍वासघात करणार्‍यांना जनतेने अद्दल घडवावी

0
109

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांची तिखट प्रतिक्रिया
पणजी (प्रतिनिधी)
विश्‍वासघात करणार्‍यांना धडा शिकविण्याची संधी मिळाली तर जनतेने ती सोडता कामा नये, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल व्यक्त केली.
कॉंग्रेसचे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी आमदार सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आपणाला विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री मनोहरभाईंच्या नावावर आमच्यावर निर्णय लादले जात होते. मनोहरभाई आजारी असल्याने आता, अमितभाईंच्या नावावर निर्णय लादले जाऊ लागले आहेत, असेही पार्सेकर यांनी सांगितले.
मांद्रे मतदारसंघातील पोट निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील भूमिका आत्ताच स्पष्ट करू शकत नाही. योग्य वेळी भूमिका स्पष्ट केली जाईल. माझ्या समर्थक कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीहून ङ्गोन करून सोपटे यांच्या पक्षातील प्रवेशाची माहिती दिली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना गृहीत धरले जात आहेत. गोव्यातील जनतेकडून भाजपची संभावना केली जात होती. त्याकाळापासून आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कष्ट, परिश्रम, घाम गाळला आणि निःस्वार्थी वृत्तीने काम करून पक्षाला मजबूत स्थान मिळवून दिले. पक्षासाठी अनेक वेळा निवडणुका लढविल्या त्यांना विश्‍वासात न घेता आज मोठे निर्णय घेतले जात आहेत. याचसाठी आम्ही घाम गाळला होता का? असा प्रश्‍न पार्सेकर यांनी उपस्थित केला.
गोवा विधानसभेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढविली गेली नव्हती. तरी, निवडणूक निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारली. सदर निवडणूक मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली होती. निवडणुकीतील पराभवाची जबाबदार त्यांनी स्वीकारली नाही. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनीही जबाबदारी स्वीकारली नाही, असेही पार्सेकर यांनी सांगितले.