विधानसभेच्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा समारोप काल झाला. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 12 जानेवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला होता. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावर तीन दिवस चर्चा करून तो संमत करण्यात आला.
या अधिवेशनात वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त खास चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात गोवा जमीन महसूल अधिनियम, गोवा मुंडकार यांच्यासह अनेक विधेयकांना मुजरी देण्यात आली.
विधानसभेत वर्ष 2025-26 च्या अनुदानित पुरवणी मागण्यांना (दुसरा गट) मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. तसेच, गोवा विनियोग विधेयक 2026 संमत करण्यात आले.
पाच दिवसीय अधिवेशनात बर्च नाईटक्लब अग्नितांडवाचा मुद्दा चांगलाच गाजला. तसेच युनिटी मॉल, वाढती कोळसा हाताळणी आणि अन्य काही ज्वलंत मुद्द्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत मांडलेला अस्मिता दिवस कार्यक्रमाबाबतचा खासगी ठराव 7 विरुध्द 25 मतांनी फेटाळण्यात आला.