विधानसभा पोटनिवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत शक्य

0
76

>> निवडणूक अधिकार्‍यांची माहिती

राज्यातील विधानसभा पोटनिवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता असून आयोग निवडणुकीसाठी तयार असल्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले. आयोगाला वाळपई मतदारसंघ व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी रिक्त होणार्‍या मतदारसंघात पोटनिवडणुका घ्यावा लागणार आहे.
सध्या वाळपई मतदारसंघ रिक्त झाला आहे. कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गेल्या दि. १४ एप्रिल रोजी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वरील मतदारसंघात दि. १४ ऑक्टोबर पर्यंत निवडणूक घ्यावी लागेल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दिवसापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक लढवावी लागेल. परंतु त्यांच्यासाठी अद्याप मतदारसंघ रिक्त झालेला नाही. त्यामुळे आयोग निवडणुकीची तारीख निश्‍चित करू शकत नसल्याचे नावती यांनी सांगितले.
पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले आहे. पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर करीपर्यंत आयोग निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, असे असले तरी पोटनिवडणूक एकाच वेळी घेतली जाईल.