विधानसभा निवडणूक जानेवारीत?

0
75

>> निवडणूक उपायुक्तांनी अधिकार्‍यांच्या घेतल्या बैठका

 

गोवा विधानसभेची निवडणूक जानेवारी २०१७च्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य निवडणूक आयुक्त गोव्यात येणार असून त्यानंतर निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल, असे निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील भाजप-कॉंग्रेस, मगो या प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच अन्य पक्षांचीही विधानसभा निवडणूक किमान फेब्रुवारी अखेरपर्यंत व्हावी, अशी इच्छा आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. परंतु फेब्रुवारी महिना हा कार्निव्हल उत्सवाचा काळ आहे त्यामुळे फेब्रुवारीत निवडणुका घेणे संबंधित यंत्रणेलाही गैरसोईचे असल्याने जानेवारीच्या शेवटचा आठवडा हाच योग्य असल्याचे निवडणूक अधिकार्‍यांचे मत आहे. निवडणुकीची तारीख ४५ दिवस अगोदर जाहीर होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार असल्याने सरकारला आता विकासकामांसाठी दोन महिनेच मिळणार आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचार संहिता लागू होते.
निवडणूक दीड महिना अगोदर होण्याची स्थिती निर्माण झाल्याने निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून उद्या दि. १५ पासून निवडणूक यंत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होईल.
निवडणूक उपायुक्तांच्या
अधिकार्‍यांबरोबर बैठका
दरम्यान, निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी निवडणूक उपआयुक्त उमेश सिन्हा यांचे काल दुपारी गोव्यात आगमन झाले. दुपारपासून त्यांनी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी व अन्य सर्व संबंधितांच्या बैठका घेतल्या. काल रात्री दहा वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. आज सकाळी सिन्हा दिल्लीला प्रयाण करतील.
यावेळी निवडणुकीसाठी लागणार्‍या मनुष्यबळाची म्हणजेच सरकारी कर्मचार्‍यांची, त्यांच्या बँकेतील खात्यांसह संपूर्ण माहिती गोळा करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. त्यामुळे सध्या सर्व खात्यांतील कर्मचार्‍यांची नावे व माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे.
राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी चाचपणी करण्यास बर्‍याच काळापासून सुरुवात केली होती.