– गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक
नामदेव ढसाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला. दलित चळवळीसाठी काम करतानाच साहित्यविश्वातही आपली वेगळी मुद्रा उमटवणारा हा माणूस इतक्या लवकर या जगाचा निरोप घेईल असं वाटलं नव्हतं. पण, तो आघात आता सहन करावा लागत आहे. नामदेव ढसाळ यांचे आणि माझे गेल्या ४०-४५ वर्षांपासून अगदी घरोब्याचे संबंध होते. त्यांची परिवर्तनवादी चळवळ आणि लेखन यामुळे आमच्यामध्ये स्नेहाची जवळीक निर्माण झाली. आता त्यांच्या जाण्याने आपल्या जवळचा माणूस गेल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
नामदेव ढसाळ हे केवळ मराठी साहित्यविश्वातील नव्हे तर भारतीय साहित्यक्षेत्रातील एक मोठे नाव होते. ४० वर्षांहून अधिक काळ ते लेखन करत होते. ते एक विद्रोही व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या लेखनातून सातत्याने परिवर्तनवादी विचार व्यक्त होत राहिले. ढसाळ यांच्या कवितांमध्ये काहीसा आक्रमकपणा होता. त्यांच्या लेखनातही विद्रोह होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि लेखनातील विद्रोह हा विद्ध्वंसक नव्हता तर रचनात्मक होता. गेल्या ४५ वर्षांपासून नामदेव ढसाळ यांचा सहवास लाभल्याने त्यांचे विद्रोही विचार ऐकता आले. ढसाळ यांनी साहित्यात जशी स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली त्याचप्रमाणे चळवळीतही वेगळा ठसा उमटवला. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान स्वीकारून जनमानसात रुजवण्यासाठी ठोस भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेेडकर यांच्या तत्त्वज्ञानानेच प्रेरित होऊन त्यांनी नंतरच्या काळात आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन दलित पँथरची स्थापना केली. दलित पँथरमधून किंवा व्यक्तीश: लोकांमध्ये जाऊन दलितांमध्ये संघटनात्मक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न ढसाळ यांनी सातत्याने केला. दलितांमध्ये नवी संघटनात्मक पातळी निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. जेथे जेथे अन्याय, अत्याचार होत असतील तेथे तेथे ते धावून जात असत. मग ते अत्याचार दलितांवर असोत वा अन्य कोणावरही, ढसाळ यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे हे अन्याय दूर व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
त्यांचे विचार आणि चळवळ यामध्ये अभिन्नता होती. अस्मितादर्श ही त्यांनी लिहिलेली पहिली कविता. त्यानंतर ते अस्मितादर्श वाङ्मयीन परिवारात कायम राहिले. नागपूर येथे अस्मितादर्श वाङ्मय संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्षपद ढसाळ यांनी भूषवले. त्यांनी काव्यलेखनाबरोबरच स्ङ्गूट लेखनही केले. त्यांच्या स्ङ्गूट लेखनातील विचार प्रज्वलक पद्धतीचे होते. दलितांसाठी त्यांनी केलेल्या कामांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या लेखनातूनही त्यांनी दलितांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात नेहमी आवाज उठवला. नामदेव ढसाळ हा एकदाच जन्मतो आणि त्याची कविताही एकदाच जन्माला येतेे. त्यांच्या कविता सत्य परिस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढणार्या आहेत. त्यांची कविता कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारत नाही. नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या कवितांमध्ये शिरावे लागेल. जातीव्यवस्थेने घातलेल्या मणामणाच्या बेड्या वागवत, मान खाली घालून चालणार्या समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्ङ्गुल्लिंग चेतवले. याच वणव्याचा धगधगता झेंडा खांद्यावर घेणार्या नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या लेखणीतील शब्दांचा उपयोग अक्षरश: हत्यारासारखा केला. त्यातून त्यांनी शोषक व्यवस्थेचे वाभाडे काढले. त्यांची कविता कधीच गुळमुळीत भासली नाही. ती एका सामाजिक बांधीलकीची कविता ठरली. शोषकांविरोधात उगारलेल्या जहाल मुठीचा आविष्कार त्यांच्या कविता आणि इतर लेखनातून पहायला मिळतो.
त्यांच्या ‘गोलपीठा’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्यात वादळ निर्माण केले. या काव्यसंग्रहातून नामदेव ढसाळ यांनी मांडलेली शोषित समाजाची वेदना इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणी धजावणार नाही. नामदेव ढसाळ हे त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात वावरले तो मुंबईतील वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपीठा. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. मुंबईत आल्यावर तेथील गोलपीठामध्ये त्यांचं बालपण गेलं. तेथील वास्तव जीवनावर भाष्य करणार्या कविता त्यांनी ‘गोलपीठा’ या काव्यसंग्रहातून मांडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असणारे नामदेव ढसाळ तरुण वयात दलित चळवळीकडे आकर्षित झाले. त्यांनी लेखनासाठी वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले असले तरी त्यांच्या प्रत्येक लेखनातून डॉ. बाबासाहेबांचे क्रांतीकारी विचार तेवढ्याच प्रखरपणे मांडण्यात आलेले दिसतात. नामदेव ढसाळ यांनी साहित्यविश्वात क्रांतीकारी कामगिरी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीच पण, आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांचा सन्मान झाला. साहित्याच्या आणि चळवळीच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा ङ्गोडून त्यांना न्याय मिळवून देणारे नामदेव ढसाळ हे दलितांचे खर्या अर्थाने सुहृद होते. त्यांनी स्थापन केलेल्या दलित पँथरने महाराष्ट्रालाच नाही तर देशाच्या राजकारणाला हादरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांसाठी ढसाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले. सरकारने दलितांच्या हितासाठी कोणती भूमिका घेतली पाहिजे हे ढसाळ यांनी आपल्या भाषणातून सांगितले. लेखनातूनही ते हे विचार मांडत राहिले.
नामदेव ढसाळ हे प्रारंभी मार्क्सवादाकडे झुकले होते. पण, नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झाले आणि त्यांनी डॉ. आंबेडकरांचेच विचार अवलंबले.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पण, इतक्या लवकर ते जातील असं वाटलं नव्हतं. आमचे घरोब्याचे संबंध असल्याने सातत्याने एकमेकांची विचारपूस होत असे. केशव मेश्राम, मी, ढसाळ आणि तत्सम मंडळी एकत्र बसून अनेकदा गप्पा मारत असू. त्या प्रत्येक वेळी नामदेव ढसाळ यांच्या मनातील विद्रोही विचार व्यक्त होत असत. त्यांच्या जाण्यामुळे साहित्य विश्वात मोठी हानी झालीच. पण, दलितांचा कैवारीही त्यांना सोडून गेला. हा माणूस निघून गेला असला तरी त्यांचे विचार मागे राहणार आहेत.