मांझींना हायकोर्टाचा दणका

0
92

८ आमदारांना बहुमत प्रक्रियेत मज्जाव
बिहारसह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेत आज मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना बहुमताच्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून तत्पूर्वी काल पाटणा हायकोर्टाने दणका देताना जेडीयूच्या ८ आमदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घातले आहेत. हे आठही आमदार मांझी गटाचे असल्याचे सांगितले जाते.आज मांझी सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यांच्या आठ आमदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवल्यानंतर विधानसभेतील सदस्यसंख्या २३५ वर येणार असून बहुमतासाठी ११३ सदस्यांची गरज लागणार आहे. मांझी यांनी जदयूसोबत बंड पुकारून आता त्यांनाच विरोधी बाकांवर बसण्यास भाग पाडले आहे. सध्या त्यांच्यासोबत १२ आमदार तसेच २ अपक्ष देखील असल्याचा त्यांचा दावा आहे. भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र, राज्य भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांनी सर्व काही केंद्रीय नेतृत्वावर सोडले असून आज होणार्‍या बहुमतावेळी भाजपची भूमिका स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, काल विधानसभा सभापतींनी सदस्य संख्येच्या आधारावर जनता दल (यू) ला विरोधी पक्षाचा दर्जा दिला असून जदयूचे आमदार विजय चौधरी यांना विरोधीपक्ष नेतेपदी निवडण्यात आले आहे. पूर्वी हे पद भाजपकडे होते. या निर्णयामुळे भाजप आमदार संतप्त झाले असून त्यांनी सभापतींच्या कार्यालयाबाहेर धरणे धरून तोडफोडही केली.