विदेश सचिव सुजाता सिंग यांची तडकाफडकी उचलबांगडी

0
88

कॉंग्रेसची मोदी सरकारवर टीका
देशाच्या विदेश सचिव सुजाता सिंग यांची मोदी सरकारने अचानक उचलबांगडी केल्यामुळे कॉंग्रेस व भाजप यांच्यात जोरदार राजकीय वाक्‌युद्ध सुरू झाले आहे. मात्र जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपने असा निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विदेशी व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून एस. जयशंकर यांची केलेली नियुक्ती हा योग्य निर्णय आहे.
मात्र कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘सर्वात ज्येष्ठ असलेल्या महिला विदेश सचिवांची अशी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याने या सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेबद्दल गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे’, असे सूरजेवाला म्हणाले.
अलीकडेच विशेष संरक्षण गटाचे प्रमुख, संरक्षण संशोधन विकास संघटनेचे प्रमुख व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक यांनाही अशाच पद्धतीने हटविण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुजाता सिंग यांना हटविण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात येऊन गेल्यानंतर सुजाता सिंग यांची उचलबांगडी झाली असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असल्याचे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी या प्रकरणाचा देवयानी खोब्रागडे प्रकरणाशी संबंध जोडला आहे. काही काळापूर्वी अमेरिकेतील भारतीय दुतावास अधिकार देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात एक वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सुजाता सिंग यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे.
भाजपच्या प्रवक्त्या नलिन कोहली यांनी वरील निर्णय घेण्याचा हक्क सरकारला आहे, असा दावा केला. याआधी कॉंग्रेस सरकारनेही अशी कृती केली असल्याचे त्यांनी सांगितले.