केरीतील तीन हजार काजू झाडे आगीत खाक

0
102

केरी-गाडाचावाडा येथील माट पठार येथील डोंगराळ भागातील काजू बागायतींना काल दुपारी अचानक आग लागून त्यात सुमारे तीन हजार काजूची झाडे खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या झाडांना नुकतीच फळे लागण्यास प्रारंभ झाला होता. अनेक बागायतदारांना या आगीचा फटका बसला आहे.केरी-गाडाचावाडा येथील माट पठार येथील डोंगराळ भागात काल दुपारी ३.३० वाजता आग लागल्याचे लोकांना कळल्यानंतर तीस ते पस्तीस लोकांनी डोंगराकडे धाव घेऊन दोन तासांनी अथक प्रयत्न करून काजूंच्या झाडांना लागलेली आग विझविण्यात आली. ऐन काजू लागण्याच्या तोंडावर अंदाजे तीन हजारांच्या आसपास झाडे जळून खाक झाली. काही काजू बागायतदार बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघां बागायतदारांची संपूर्ण बागायती जळून खाक झाल्या आहेत. जळून खाक झालेल्या काजूच्या झाडांपर्यंत अग्निशमन दलाचा बंब जाऊ न शकल्यामुळे स्थानिकांबरोबर अग्निशामक दलांच्या जवानांना पायपीट करून त्या ठिकाणी जावे लागले.
राघोबा मठकर यांच्या दोनशे काजूंच्या झाडांना आग लागून खाक झाली. तसेच केवश मठकर यांची ८०, चंद्रकांत गाड ३००, राजन गाड २००, उत्तम नागोजी २००, गोपाळ गाड, हरी गाड, रामचंद्र गाड, नामदेव गाड या बंधुंची १०००, रामा मोरे, विश्‍वास मोरे, गुरू मोरे या तिघा बंधुंची ८००, धर्मा नार्वेकर १००, गंगाराम व राजाराम मठकर २५ काजूची झाडे जळून खाक झाली आहेत.
अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रदीप मांद्रेकर तसेच नितीन चोडणकर, विशाल पाटील, संजय फडते, हर्षद सावंत, लक्षद्वीप हरमलकर यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.