मांडवीतील कॅसिनो हटविण्यासाठी कॉंग्रेसचे ६ फेब्रुवारीपासून आंदोलन

0
88

पोटनिवडणुकीसाठी फुर्तादोंचा जाहीरनामा प्रकाशित
पणजी मतदारसंघासाठी १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने काल अ. भा. कॉंग्रेस सचिव चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
जाहीरनाम्यात नमूद केलेले नसले तरी मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्यासाठी आपला पक्ष आंदोलन करणार असून त्याची सुरुवात दि. ६ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावरील मेणबत्त्या मिरवणुकीने केली जाईल, अशी माहिती फालेरो यांनी यावेळी दिली.पणजी मतदारसंघातील कचरा, वाहतूक समस्या, बाजार या विषयांवर अधिक भर देण्याचे पक्षाने ठरविले असून गेल्या २० वर्षांच्या काळात न झालेला विकास पूर्ण करण्यासाठी पक्षाचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांना संधी देण्याचे आवाहन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
शहरातील रस्ते, वीज व पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन पणजी शहराचा कायापालट करण्याचे आश्‍वासन जाहीरनाम्यात दिले आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात पणजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कचर्‍याच्या प्रश्‍नावर तोडगा काढणे सरकारला शक्य झालेले नाही. गेल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नसल्याचे फुर्तादो यांनी सांगितले. पणजी हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. सांतइनेज नाल्याचा प्रश्‍न सोडविणे कोणालाही शक्य झालेले नाही, असे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी यावेळी सांगितले. महापौर म्हणून फुर्तादो यांनी चांगले काम केले. त्या अनुभवाचा त्यांना फायदा होईल, असे राणे यांनी सांगितले.
सरकारने प्रकल्प अडवले : फुर्तादो
भाजप सरकारने महापालिकेचे अनेक प्रकल्प अडवून ठेवल्याचा आरोप उमेदवार फुर्तादो यांनी केला. मिरामार भागाचा ज्या पद्धतीने आपण विकास केला. त्याच धर्तीवर संपूर्ण पणजी शहराचा विकास करण्याचे आश्‍वासन फुर्तादो यांनी जाहीरनाम्यातून दिले आहे.