विदेशी नागरिकांसाठी लवकरच आयुष व्हिसा

0
12

>> पंतप्रधानांची घोषणा; गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक परिषद

विदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. भारतात पारंपारिक उपचार घेण्यासाठी येणार्‍या विदेशी नागरिकांना लवकरच विशेष आयुष व्हिसा दिला जाईल, असे मोदी म्हणाले. या घोषणेमुळे विदेशी नागरिक भारतात येऊन पारंपारिक औषधांच्या सहाय्याने उपचार घेऊ शकतील.

गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते.

आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि नवे उपक्रम राबवण्याच्या शक्यता अमर्याद आहेत. आम्ही आधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ पाहत आहोत. आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत. हा हॉलमार्क भारतात उत्पादन करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केला जाईल. हा आयुष हॉलमार्क लवकरच लॉंच केला जाईल. तसेच शेतकर्‍यांना औषधी वनस्पती वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.