विजया श्रीपाद नाईक यांचा अखेरचा प्रवास..

0
207

सोमवारी अंकोला – कर्नाटक येथे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात श्रीपाद यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या दुर्दैवी मृत्यूने श्रीपाद नाईक यांच्या सहजीवनाचा अंत झाला. या अपघातामुळे सारे गोमंतकीय हळहळत आहेत.

श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया या अत्यंत सुस्वभावी होत्या. भाजपचा गोव्यातील परिवार तसेच श्रीपाद यांचे गोव्यातील कार्यकर्ते यांच्या त्या वहिनी म्हणून सुपरिचित होत्या. घरी येणार्‍या प्रत्येक भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याचे त्या आनंदाने व आपुलकीने स्वागत करायच्या.
पदाधिकारी वा कार्यकर्ते घरी आल्यानंतर त्या स्वतः त्यांना चहा करून द्यायच्या. अत्यंत साधी रहाणी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या विजया नाईक यांच्या निधनामुळे गोव्यातील भाजप परिवाराला फार मोठा धक्का बसला आहे.

..त्यावेळी श्रीपाद शुद्धीवर
होते ः कारवार आमदार

या अपघाताविषयी कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांनी सांगितले की, श्रीपाद नाईक यांना अपघात झाला त्यावेळी आम्ही तिथेच होतो. श्रीपाद हे धर्मस्थळाला गेले होते. रात्री १ वा. गोकर्ण मंदिरात ते पूजा करणार होते. त्यामुळे तातडीने गोकर्णाच्या बाजूने श्रीपाद चालले होते. पुजेसाठी विलंब होऊ नये म्हणून जंगलातून जाणार्‍या रस्त्याने जाणे त्यांनी पसंत केले. रात्रीची वेळ, अरुंद व खराब रस्ता यामुळे हा अपघात झाला असावा असे त्या म्हणाल्या. एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा गेल्यामुळे गाडी उलटली. त्यावेळी आम्ही तिथेच होतो. अपघातानंतर श्रीपाद यांना त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे सांगून आमदार नाईक यांनी, श्रीपाद यांच्या हाताचे हाड मोडले होते व रक्तस्त्रावही होत होता व त्यावेळी ते शुद्धीवरही होते असे त्यांनी सांगितले.
आमच्या एस्कॉर्ट गाडीने त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. आमच्या गाडीला ओव्हरटेक करून त्यांची गाडी गेली होती. गाडीत पाच सहाजण असल्याचेही आम्ही पाहिले होते. मात्र दुर्दैवाने श्रीपाद यांच्या पत्नी विजया यांचे प्राण वाचू शकले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.