राजनाथसिंहकडून श्रीपाद यांची चौकशी,गोमेकॉच्या डॉक्टरांना केल्या सूचना

0
219

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल गोमेकॉत येऊन तेथे उपचार घेणारे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. दिल्लीहून विशेष विमानाने गोव्यात आलेल्या मंत्री सिंह यांचे दुपारी २.३५ वा. कडक पोलीस बंदोबस्तात गोमेकॉत आगमन झाले. श्रीपाद नाईक यांची आयसीयूत जाऊन भेट घेतल्यानंतर सिंह यांनी गोमेकॉतील डॉक्टरांची एक बैठक घेऊन नाईक यांची प्रकृती व उपचार याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

तद्नंतर पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले की, श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नसावे. गोमेकॉतील डॉक्टरांनी त्यांच्यावर चांगले उपचार केले असल्याचे प्रमाणपत्रही सिंह यांनी यावेळी दिले. श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी नवी दिल्लीला हलवण्याचा विचार आहे का, किंवा एम्समधील डॉक्टरांना पाचारण केले जाईल का, असे पत्रकारांनी विचारले असता त्याची गरज भासेल असे दिसत नाही. मात्र, गरज भासल्यास एम्समधील डॉक्टरना येथे पाचारण करण्यात येणार असल्याचे ट्विट त्यांनी मागाहून केले.

राष्ट्रपतींकडूनही चौकशी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही काल दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधून श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची चौकशी केली. श्री. नाईक यांच्या पत्नीच्या निधनाविषयी राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला. तसेच श्रीपाद यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी कामना करणारे ट्विटही त्यांनी केले

शॉर्टकटने केला घात
श्रीपाद नाईक यांच्या गाडीला झालेल्या या अपघाताला शॉर्टकट कारणीभूत ठरला. नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे गणपतीचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्वजण गोकर्णकडे रवाना झाले. राष्ट्रीय महामार्ग-६३ वरून त्यांच्या गाडीने छोटय रस्त्यावरून शॉर्टकट घेतला. यामुळे ४० किमी अंतर कमी होणार होते. पण नेमका इथेच घात झाला. तो रस्ता अतिशय खराब होता, त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पलटली.

एम्स डॉक्टरांची मदत
घेणार ः मुख्यमंत्री

श्रीपाद नाईक यांच्यावर अजून उपचार करण्यासाठी एम्समधील डॉक्टरांची मदत घेतली जाणार असून त्यासाठी त्यांना गोव्यात पाचारण करण्यात येणार असल्याचे ट्विट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.