केंद्रिय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे प्रतिपादन
कांपाल पणजीत आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचा शुभारंभ
दिव्यांगांना त्यांच्यात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव हा आगळ्या-वेगळ्या रूपात सादर होत आहे. यात विविध खेळांचा आणि स्पर्धाचा समावेश केल्याने सहभागी होणाऱ्यांची वाढती संख्या ही कौतुकास्पद आहे. विकसित भारत निर्माण करण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्तरावर पुढे जाण्यासाठी दिव्यांगानासुद्धा सामावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.
दिव्यांगजन सबलीकरण खाते आणि दिव्यांगजन राज्य आयुक्तालय यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचा काल कांपाल पणजी येथे गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात थाटात शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, भारतातील यूएन रेसिडेन्ट को-ऑर्डीनेटर शोम्बी शार्प, केंद्रीय समाज न्याय व सबलीकरणे सचिव राजेश आगरवाल, दिव्यांगजन सबलीकरण मंत्री सुभाष फळदेसाई, दिव्यांगजन राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर उपस्थित होती.
दिव्यांग व्यक्तीमध्ये प्रतिभा, सुप्त गुण असतात. पर्पल महोत्सवाच्या माध्यमातील विविध खेळांमुळे त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना, प्रोत्साहन मिळते असे सांगून डॉ. कुमार यांनी, गोव्याचा आदर्श समोर ठेवून देशातील विविध राज्यांनी दिव्यांग व्यक्तीच्या सबलीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आजच्या काळात दिव्यांग व्यक्तींनासुध्दा योग्य सन्मान प्राप्त करून दिला जात आहे. दिव्याग व्यक्तीच्या कलागुणांना चालना दिली जात आहे. दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली विविध उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था केली जात आहे. देशात आतापर्यंत 25 दिव्यांग कला मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे, असेही केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.
राज्यातील समुद्रकिनारे, सरकारी इमारती दिव्यांग व्यक्तींना प्रवेश सुलभ बनविण्यात येणार आहेत. राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध आहोत. दिव्यांग व्यक्तींना विविध साधन सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाच्या शुभारंभ समारंभात बोलताना केले.
पर्पल हा केवळ महोत्सव नसून दिव्यांगजन सबलीकरणाची चळवळ आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. यावेळी गुरुप्रसाद पावसकर यांनी विचार मांडले. वर्षा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
पर्पल महोत्सवामुळे दिव्यांगांच्या
सक्षमीकरण प्रक्रियेस चालना
केंद्र आणि राज्यातील सरकारे देशातील सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना येथे काल दिली.
गोव्यातील पर्पल महोत्सवामुळे दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.
वोट चोरीच्या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एनडीए सरकार 2029 मध्ये पुन्हा बहुमताने सत्तेवर येईल, असाही दावा यावेळी आठवले यांनी केला.
देशाचे सरन्यायधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला निषेधार्थ आहे. हल्ला करणाऱ्याच्या विरोधात एससी, एसटी ॲट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.
गोव्यातील आदिवासी नेते रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जखमी रामा काणकोणकर यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा या आवश्यक पाऊल उचलण्याची गरज आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.