Home Featured म्हापसा दरोडाप्रकरणी दोघे ताब्यात

म्हापसा दरोडाप्रकरणी दोघे ताब्यात

0

संशयित बंंगळुरू व हैदराबाद येथील

गणेशपुरी म्हापसा येथे डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोडाप्रकरणी बंगळुरू, हैदराबाद येथून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शिवाय कारचालक आणि त्याच्या सहकाऱ्याची कसून चौकशी सुरू असून यात सहभाग असणाऱ्या इतरांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक चौकशीत दोनापावला आणि म्हापसा दरोड्यात एकाच टोळीचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी पहाटे तीन ते पाच या दरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तपास यंत्रणेला गती दिली आहे. डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे 35 लाखांचा ऐवज लुटला होता. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर बेळगावध्ये पसार झाल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या जोरावर पोलिसांनी तपास पथके गतिमान केली. यानंतर कारवाई करत बंगळुरू, हैदराबाद येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.
तपासासाठी पोलिसांची सुमारे आठ पथके शेजारील राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. यातील काही पथके कर्नाटकमधील बेळगावपासून बंगळूरूपर्यंत तर काही पथके कोल्हापूर, मुंबई तसेच विजापूर, हैदराबाद या शहरांमध्ये संशयितांचा शोध घेत आहेत. दरोडेखोर पळून गेलेल्या मार्गावरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले आहे. मात्र, त्यामध्ये आतापर्यंत काहीच संशयास्पद आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी पहाटे डॉ. घाणेकर कुटुंब गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला व 35 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

दरोडेखोर बेळगाव येथे पसार
दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून नेला. तसेच दरोडेखोरांनी डॉ. घाणेकर यांचे मोबाईल आणि मारुती कार नेली होती. ती मंगळवारी पहाटे 5.45 वाजता पणजी बसस्थानकाकडे सापडली. यातील सहाजणांनी पणजी येथील येलो ब्लॅक टॅक्सी घेतली. त्यावेळी टॅक्सी चालकाला बेळगावला पोहचवण्यास सांगितले. गोव्याबाहेर जायचे असल्याने टॅक्सी चालकाने जुने गोवा – खोर्ली येथून दरोडेखोरांना खासगी कार करून दिली. या माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.