विकट भगतला जन्मठेपेसह तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

0
3

>> आयरिश तरुणीवरील बलात्कार व खून प्रकरण; 8 वर्षांनी मिळाला न्याय

>> 60 हजारांचा दंडही ठोठावला; दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त कैद

आयरिश पर्यटक तरुणी डॅनियली मॅकलॉग्लिन (28) हिच्या खून प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या विकट भगत (रा. भगतवाडा-काणकोण) याला बलात्कार आणि खून प्रकरणी या दोन्ही गुन्ह्यांखाली काल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून 3 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच तिन्ही गुन्ह्यांसाठी 60 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

डॅनियली मॅकलॉग्लिन हिच्यावरील बलात्कार व खून प्रकरणी विकट भगत याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोषी ठरविले होते आणि शिक्षेसाठी सोमवारचा दिवस निश्चित केला होता.

विकट भगतला भारतीय दंड संहिताच्या 302 कलमानुसार खूनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेप व 25 हजार रुपये दंड, कलम 376 नुसार बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप व 25 हजार रुपये दंड आणि कलम 201 नुसार पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्याखाली तीन वर्षांची सक्तमजुरी शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास एक वर्षांची अतिरिक्त साध्या कैदेची शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. ह्या सर्व शिक्षा त्याला एकत्रित भोगायच्या आहेत, असे दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

हा निवाडा ऐकून डॅनियली मॅकलॉग्लिन हिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. डॅनियली कुटुंबीयांचे वकील विक्रम वर्मा यांनी निवाड्याचे स्वागत केले. या खटल्याचा निकाल लागण्यासाठी आम्हाला आठ वर्षे वाट पहावी लागली; मात्र आम्हाला शेवटी न्याय मिळाला. पोलीस अधिकारी व सरकारी वकिलांनी हा खटला हाताळला व डॅनियलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला. आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे वकील विक्रम वर्मा यांनी सांगितले.
खटल्याच्या निकालावेळी या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि विद्यमान पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई हजर होते. हे आमच्या सांघिक तपास व प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. काल निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती.

नेमके प्रकरण काय?

डॅनियलीचे खून प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते. डॅनियली ही 2017 मध्ये एका मित्रासोबत सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आली होती.
13 मार्च रात्री ते 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास डॅनियलीचा खून झाला होता. दक्षिण गोव्यातील काणकोण येथील पाळोळे किनाऱ्याजवळील राजबाग येथे निर्जनस्थळी एका शेतात विवस्त्र स्थितीत तिचा मृतदेह आढळला होता. तिच्या चेहऱ्यावर व डोक्यावर जखमा होत्या.
शवचिकित्सेनंतर डॅनियली हिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून झाल्याचे समोर आले होते.
तत्कालीन पोलीस निरीक्षक व विद्यमान उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी प्रकरणाचा छडा लावत संशयावरून काणकोण येथील विकट भगत याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीत विकटने बलात्कार करून खून केल्याचे कबूल केले होते.