स्मार्ट सिटी : सुधारित प्रस्ताव लवकरच केंद्राला

0
83

>> आमदार कुंकळकरांची माहिती

पणजी स्मार्ट सिटीसाठीचा नवा सुधारित प्रस्ताव येत्या २१ रोजीपर्यंत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे पणजीचे आमदार तथा जीएस्‌आय्‌डीसीचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. स्मार्ट सिटीसाठीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती व पणजी महापालिकेने नव्या सुधारीत प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली असल्याची माहिती सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.

यावेळी स्मार्ट सिटीसाठी पणजीची निश्‍चितच निवड होईल, असा विश्‍वास कुंकळ्येकर यांनी व्यक्त केला. पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की पणजीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी एवढीच आपली इच्छा आहे. नव्या सुधारीत प्रस्तावाविषयी तुमचे काय मत आहे असे विचारले असता ते काम जीएस्‌आय्‌डीसीने केलेले आहे. त्यामुळे तेच काय ते सांगू शकतील, असे फुर्तादो म्हणाले. यंदा पणजीची स्मार्ट सिटीसाठी निवड होईल असा जीएस्‌आय्‌डीसीला विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.