वाहतूक नियमभंगासाठी 500 पासून 10 हजारांपर्यंतचा दंड

0
13

>> सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पणजी, पर्वरीत बेशिस्त वाहनचालकांवर होणार कारवाई

वाहतूक खात्याकडून 1 जूनपासून पणजी व पर्वरी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असून, त्याद्वारे आकारण्यात येणाऱ्या दंडाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार 500 रुपयांपासून 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक सिग्नल तोडल्यास प्रथम उल्लंघनासाठी 500 रुपये दंड ठोठावला जाणार असून, पुढील उल्लंघनासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. स्वयंचलित पद्धतीने दंडाचे चलन वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे.

वाहतूक खात्याकडून पणजी, पर्वरी, मेरशी व इतर भागात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर या वाहतूक नियमभंगासाठी किती दंड आकारला जाणार हे वाहतूक खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहन चालविताना मोबाईल फोनवर संभाषण करीत असल्याचे कॅमेऱ्याने टिपल्यास पहिल्या उल्लंघनासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावला जाणार असून, त्याच प्रकारच्या पुढील उल्लंघनासाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. सीट बेल्ट न वापरल्यास आणि हेल्मेट परिधान न केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंड ठोठावला जाईल. वेगमर्यादा न पाळणाऱ्या कारला 1 हजार रुपये आणि अवजड वाहनाला 2 हजार रुपये दंड ठोठावला जाईल. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचा बंब यांना रस्ता मोकळा न केल्यास 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे. नो पार्किंगच्या जागी वाहन पार्क केल्यास 500 रुपये, दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त जणांना बसविल्यास 1 हजार रुपये, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट आणि धोकादायक ओव्हरटेकिंगसाठी 500 रुपये दंड केला जाईल, असे जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार काही नियमभंगासाठी दंडाबरोबर 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, असे वाहतूक खात्याने म्हटले आहे.