वास्कोवरील विजयासह धेंपो पुन्हा अव्वल स्थानी

0
104

ज्योकिम अब्रांचिस आणि सुरज हडकोणकर यांनी दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने वास्को स्पोटर्‌‌स क्लबचा २-० असा पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या १२व्या फेरीतील सामन्यात पूर्ण गुणांची कमाई केली.

या विजयामुळे धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे १० सामन्यांतून २४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी पाहोचले आहेत. तर पराभूत वास्को स्पोटर्‌‌स क्लब ९ सामन्यांतून केवळ ८ गुणांवर आहे.
धुळेर फुटबॉल स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात धेंपोने ज्योकीम अब्रांचिस आणि नेस्टर डायसला अंतिम अकरात संधी दिली. तर वास्कोचे प्रशिक्षक इबान मेक्विताने एकमेव बदल करताना स्ट्रायकर बेनेस्टन बार्रेटोला मैदानावर उतरविले.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. मात्र दुसर्‍या सत्रात धेंपोने आक्रमक खेळावर भर देत दोन गोल नोंदविण्यात यश मिळविले. ६४व्या मिनिटटला सुरज हडकोणकरकडून मिळालेल्या अचूक पासवर ज्योकिम अब्रांचिसने वास्कोचा गोलरक्षक अमित बिस्वासला कोणतीही संधी न देता धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे खाते खोलले (१-०). तर ७२व्या मिनिटाला सुरज हडकोणकरने ज्योकीम अब्रांचिसच्या साथीत धेंपोच्या २-० अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.