वास्कोत पेट्रोल पंपवरील पावणे तीन लाखांची रक्कम लुटली

0
117

कर्मचार्‍याच्या हातातील बॅग हिसकावली
मुंडवेल-वास्को येथील लक्ष्मी पेट्रोलियम पेट्रोल पंपवरील एका कर्मचार्‍याच्या हातातील दोन लाख सत्तर हजार रुपये असलेली बॅग शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात मोटरसायकल स्वारांनी पळवून नेल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे.वास्को पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार पल्सर मोटारसायकलने आलेल्या दोघा अज्ञातांनी लक्ष्मी पेट्रोल पंप येथील कर्मचार्‍यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या पेट्रोल पंपाच्या मालकाचा वास्को येथील मशीदीसमोर आणखी एक पेट्रोल पंप आहे. त्याच पंपावरील २ लाख ७० हजार रुपये घेऊन तेथील कर्मचारी सागर आणि महेश हे दोघेजण मुंडवेल येथे रोकड जमा करण्यासाठी लक्ष्मी पेट्रोल पंपवर आले होते. हे दोघेही कर्मचारी लक्ष्मी पेट्रोल पंपवर पोचताच त्यांच्या मागून आलेल्या दोघा अज्ञातांनी बॅग हिसकावून पळ काढला. दोघेही चोरटे पल्सर मोटरसायकलने आले होते. चोरटे चिखलीच्या दिशेने गेल्याचे पंप कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, घटना घडली त्या ठिकाणापासून वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे निवासस्थान आहे. त्यानाही घटना लगेच कळल्यावर त्यांनी पोलिसांना सतर्क केले. बिनतारी संदेशाद्वारे वास्को पोलिसांनी सर्वत्र माहिती दिली. चोरटे रात्रीच राज्याबाहेर पसार होऊ नयेत म्हणून गोव्याच्या सीमेवरील पोलिसानाही सतर्क करण्यात आले.
तथापि, लक्ष्मी पेट्रोलपंपवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे चोरट्यांची छबी कॅमेरात कैद झाली आहे, मात्र मोटरसायकलचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. चोरट्यांनी योजनाबध्दरीत्या चोरी केलेली असून त्याना एका पेट्रोलपंपवरून दुसर्‍या पंपावर पैसे नेण्याच्या बाबतीत माहिती असावी असा पोलिसांचा कयास आहे.