पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या विदेशींचे परवाने रद्द करावेत

0
102

पोलीस महानिरीक्षकांच्या बैठकीत इशारा
पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी काल पर्यटन व्यवसाय क्षेत्रातील लोकांची बैठक घेऊन या व्यवसायात रशियन किंवा अन्य विदेशी नागरिकांना गुंतविल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देऊन या व्यवसायात स्थानिकांनाच सामावून घेण्याचा आदेश दिला आहे. व्यवसाय करण्याचा परवाना नसलेले अनेक विदेशी नागरिक पर्यटक मार्गदर्शक (गाईड) म्हणून तसेच अन्य वेगवेगळे व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोलीस महानिरीक्षकांना बोलावून वरील प्रकरणी काळजी घेण्यास सांगितले होते. काही ‘टाऊटस’ पर्यटकांची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पुरवितात त्यामुळे राज्याची प्रतिमा मलीन होते. अशा फसवेगिरीच्या प्रकारांमुळे येथे येणारे पर्यटक आपल्या गावी जाऊन गोव्यात न जाण्याचा मित्रांना सल्ला देतात. या प्रकारामुळे भविष्य काळात पर्यटन व्यवसाय धोक्यात येऊ शकेल. त्यामुळे गंभीर पावले उचलल्याचे गर्ग यांनी सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील लोकही विदेशी नागरिकांना व्यवसायात सामावून घेत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांना माहिती पुरविणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले. टाऊटस्‌च्या मदतीने हॉटेलमधील पर्यटकांच्या खोल्यांमध्ये चोर्‍यांचेही प्रकार होत असतात. काहीजण बेकायदेशीरपणे कार गाड्या, दुचाक्या भाडेपट्टीवर देण्याचा व्यवसाय करतात त्यांचीही माहिती गोळा करण्याचे ठरविले आहे. किनारी भागातील शॅक्स मालकांनाही पोलिसांचे क्रमांक देण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.