‘वायू’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता

0
105

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून आगामी दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पणजी हवामान विभागाचे संचालक डॉ. के. व्ही. पडगलवार यांनी काल दिली.

मंगळवारी संध्याकाळी पणजी व इतर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. समुद्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून या चक्रीवादळाला ‘वायू’ हे नाव देण्यात आले आहे. हे चक्री वादळ गोव्याच्या २०० किलो मीटरवरून दुरून समांतर जात असल्याने त्याचा गोव्याला कोणताही धोका नाही. मात्र, या वादळामुळे गोव्यात पाऊस पडणार आहे. या वादळाचा वेग आगामी ३६ तासांत वाढणार असून गुजरातच्या दिशेने ते सरकत आहे. गोव्यात १२ ते १५ जून दरम्यान मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असेही पडगलवार यांनी सांगितले.

अरबी समुद्रातील वादळामुळे दक्षिण गोव्यातील विविध भागात अनेक ठिकाणी पाऊस पडला. सांगे येथे १७.२ मिलिमीटर, दाबोळी येथे ११.२ मिलिमीटर, काणकोण येथे १०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सरी कोसळत असल्याने वाढत्या तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.