Home बातम्या वयाच्या पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होणार नाही : मोहन भागवत

वयाच्या पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होणार नाही : मोहन भागवत

0

अन्य कोणालाही निवृत्त होण्यास सांगणार नाही; पत्रकार परिषदेत केले स्पष्ट; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केंद्र-राज्य सरकारांशी चांगला समन्वय

75 वर्षे पूर्ण करणाऱ्या पक्षातील नेत्यांसाठी निवृत्तीचा नियम भाजपने बनवला आहे. त्यानुसार अनेक नेत्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाठवण्यात आले आहे. आता पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे दोघेही 75 वर्षांचे होत असून, ते निवृत्त होणार का असा सवाल विचारला जात आहे. त्यावर भागवत यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली. 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण निवृत्त होणार नाही आणि कोणालाही निवृत्ती घेण्याचा सल्ला देणार नाही, असे भागवत म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्त ‘संघाच्या प्रवासाची 100 वर्षे – न्यू होरायझन्स’ या तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल विविध विषयांवर भाष्य केले. राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलत असतानाच त्यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवरही प्रकाश टाकला. तसेच एखाद्या नेत्याला 75 वर्ष पूर्ण होताच निवृत्ती घ्यावी, अशा विधानावरून निर्माण झालेल्या उलटसुलट चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस येत आहे. भाजपमधील एका अघोषित नियमाची चर्चा नेहमी होते. 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते. यासाठी काही जुन्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात बसवल्याचा दाखला दिला जातो. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असताना पंच्याहत्तरीच्या निमित्ताने केलेले एक विधान पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीशी जोडले गेले होते. त्यावर आता भागवत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी कधीही असे म्हटले नव्हते की, मी निवृत्त होईन किंवा दुसऱ्या कुणी 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त व्हावे. संघ जे सांगेल ते आम्ही करू. कोणतेही काम नाकारण्यासाठी आम्ही वयाचे कारण देऊ शकत नाही, असे भागवत म्हणाले.

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमातून मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, संघ आणि भारतीय जनता पक्षात कोणताही वाद नाही. संघ कोणत्याही मुद्द्यावर सरकारला सल्ला देऊ शकतो, परंतु अंतिम निर्णय भाजपचाच असतो. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, प्रत्येक सरकारशी आमचा चांगला समन्वय आहे.

आम्हाला काही काम करायचे आहे, परंतु खुर्चीवर बसलेली व्यक्ती 100 टक्के आपल्या बाजूने असली तरी त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. तो ते करू शकेल की नाही, हे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यात कोणताही संघर्ष, वाद नाही. मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही. सर्व अफवा आहेत. दोघांचेही ध्येय एकच आहे, ते म्हणजे देशाचे कल्याण, असेही मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी देशातील शिक्षणावरही भाष्य केले. नवीन शिक्षण धोरणात पंचकोशी शिक्षणाची म्हणजेच पाच-स्तरीय समग्र शिक्षणाची तरतूद आहे. अशा शिक्षणाची आवश्यकता आहे, जे केवळ राज्य चालवण्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजे, असे भागवत म्हणाले.

मतभेद आहेत; मनभेद नाही : भागवत

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या काल तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आरएसएसवर उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी आरएसएस आणि भाजपमध्ये मतभेद आहेत का? असा प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर देताना, मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही. सर्व अफवा आहेत. दोघांचेही ध्येय एकच आहे, ते म्हणजे देशाचे कल्याण, असे त्यांनी स्पष्ट केले. संघाचा केंद्र आणि राज्य सरकारांशी चांगला समन्वय आहे, असेही त्यांनी केले.