Home बातम्या आयआयटीसाठी आता फोंड्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

आयआयटीसाठी आता फोंड्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

0

कोडार येथील कोमुनिदादच्या 14 लाख चौ.मी. जमिनीची निवड

काणकोण, सत्तरी, सांगे, धारबांदोडा भागात आयआयटी गोवा संकुल स्थापन करण्यासाठी जमीन ताब्यात घेण्यात अपयश आल्यानंतर आता फोंडा तालुक्यातील कोडार येथील कोमुनिदादची सुमारे 14 लाख चौरस मीटर जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोमुनिदाद मध्यविभाग प्रशासनाने यासंबंधीची एक नोटीस जारी करून जमीन संपादनाबाबतीत हरकती सादर करण्यासाठी संबंधितांना 30 दिवसांची मुदत दिली आहे.

राज्यात 2016 मध्ये आयआयटी स्थापन करण्यात आली असून, आयआयटीचा कारभार सध्या फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारातून चालविला जात आहे. राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आयआयटी गोवाच्या संकुलासाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तथापि, अजूनपर्यंत आयआयटी गोवाच्या संकुलासाठी जमिनीचे संपादन होऊ शकलेले नाही. काणकोण तालुक्यात सर्वांत प्रथम आयआयटी संकुल स्थापन करण्यासाठी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथील जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न नागरिकांच्या विरोधामुळे फोल ठरला. त्यानंतर सांगे तालुक्यात जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर धारबांदोडा तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची जागा संपादित करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अपयशी ठरला.

आता, फोंडा तालुक्यातील कोडार कोमुनिदादची सुमारे 14 लाख चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. आयआयटी संकुलासाठी सुमारे 10 लाख चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे कोडार येथील जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.