वनडे मालिकेला मुकणार आर्चर

0
139

>> ज्यो रुट, ख्रिस वोक्सचा समावेश नाही

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर हा भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला तसेच आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने काल रविवारी जाहीर केले. आर्चर याच्या कोपर्‍याची दुखापत ही ईसीबीसाठी चिंतेचा विषय बनली असून मायदेशात इंग्लंडचे वैद्यकीय पथक आर्चर याच्या दुखापतीची पाहणी करणार आहे. इंग्लंडने काल रविवारी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रुट व ख्रिस वोक्स यांचा देखील भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही. कसोटी मालिकेनंतर मायदेशी परतलेली ही दुकली भारतात परत न आल्याने त्यांची निवड होणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते.रुट याला इंग्लंडच्या वनडे संघाचा कणा मानले जाते. त्याचे भारतात परत न येण्यामागील कारण ईसीबीने स्पष्ट केलेले नाही. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौर्‍यात दोन सामने खेळलेला २४ वर्षीय लेगस्पिनर मॅट पार्किन्सन याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

लँकेशायरला आघाडी फळीतील फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे वनडे पदार्पण करण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जॅक बोल, अष्टपैलू ख्रिस जॉर्डन व टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट डेव्हिड मलान हे खेळाडू राखीव म्हणून संघासोबत राहणार आहेत. वनडे मालिकेतील सामने पुणे येथे २३, २६ व २८ मार्च रोजी खेळविले जाणार आहेत. आर्चरच्या अनुपस्थितीचा जबरदस्त फटका आयपीएलमधील त्याची फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सला बसणार आहे. आर्चरच्या दुखापतीचे स्वरुप पाहता तो किमान सहा सामन्यांना तरी मुकू शकतो. आगामी ऍशेस मालिका तसेच
टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघातील स्थान नजरेसमोर ठेवून तो संपूर्ण आयपीएलमधूनच माघार घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

इंग्लंड वनडे संघ ः जॉनी बॅअरस्टोव, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, ऑईन मॉर्गन, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, रिस टोपली, आदिल रशीद, मॅट पार्किन्सन व मार्क वूड.