‘वंदे मातरम्’ : कौतुक आणि सूचनाही!

0
307

– चिंतामणी रा. केळकर, आसगाव
‘कृतार्थ’ म्हार्दोळ या संस्थेची ‘वंदे मातरम!’ ही महानाट्यनिर्मिती अतिशय उत्कृष्ट वाटली. या महानाट्याचे ‘कृतार्थ’ ने पेललेले शिवधनुष्य गोमंतकाचे नाव जगभर करील. ‘जाणता राजा’ या महानाट्याची स्फूर्ती घेऊन गोव्यात ‘संभवामि युगेयुगे’ अवतरले. मध्यंतरी साईबाबांवरील महानाट्य गोमंतकातील रसिकांना पाहण्याचे भाग्य लाभले.
‘अथपासून इतिपर्यंत सर्वांगसुंदर महानाट्याविष्कार’ असे वर्णन ‘कृतार्थ’च्या ‘वंदे मातरम’बद्दल करावेच लागेल. आदित्य जांभळे या साधारण बाविशी गाठलेल्या तरुणाने अडीच तासांत मावणार्‍या, या भारतीय स्वातंत्र्यसंग्रमावरील महानाट्याचे लेखन समर्थपणे केले आहे. थोडक्यात, पण सार्थपणे थेट शिवाजी महाराजांपासूनचे स्वातंत्र्याबद्दलचे प्रेम दर्शवत भारतातील स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास नोंदवला आहे हे कौतुकास्पद आहे.दिग्दर्शन, रंगमंच, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, वेषभूषा या कशातही उणेपणा काढायला जागा नाही. उलट भव्यतेचे दर्शनच जागोजागी घडते. काही प्रसंगांचे पडद्यावर दाखवलेले चित्रीकरण वैशिष्ट्यपूर्ण होतेच, पण दृष्यमिश्रणाचा परिपाक फारच उत्तम जमला असेच नमूद करावे लागेल.
गलबताचे आगमन, रेल्वे इंजिनाची प्रतिकृती, फाशी देण्याच्या यंत्रणेचा वापर वा प्रामुख्याने रंगमंचासमोरून उत्कृष्ट पद्धतीने सरकत जाणारा फास व त्यावेळचे संभाषण व शेवटी पुतळ्यावत राहिलेले स्वातंत्र्यसैनिक या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रत्येक भूमिकेसाठी योजलेले आवाज, तसेच संगीत अप्रतिम होते. तौलनिकदृष्ट्या विचार करता ‘संभवामि’ मध्ये प्रथम सत्रातील प्रयोगात ही कलाकृती मला महासांगीतिक वाटली. त्यात नृत्य व संगीताचा भडीमार होता. (नंतरच्या सत्रात तो नक्की कमी केला). ‘जाणता राजा’ मधला सूत्रधार प्रथम ते शेवटपर्यंत होता. या दृष्टीने त्यांच्यापेक्षा ‘वंदे मातरम’ ने यथार्थ असाच संगीत व नृत्याचा वापर केला असून ‘जाणता राजा’ च्या सूत्रधाराप्रमाणे पोवाडा गात आलेल्या अभिनेत्याने अगदी कमी वेळात उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन घडविले.
नाट्यांतर्गत नाट्य पद्धतीने ‘शारदा’ नाटकाच्या नांदीवेळी क्रांतिकारकांनी पुण्यात घडवून आणलेली हत्या व त्यावेळी ‘शारदा’ चा पडदा पाडला जाणे व त्यायोगे या महानाट्याचाही मध्यंतर घडवून आणणे या उत्कृष्ट संकल्पनेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. नेपथ्य, दिग्दर्शन,रंगमंच इत्यादी, इत्यादी कोणत्याही ठिकाणी चूक काढायला जागा नसणे हेच ‘वंदे मातरम!’ महानाट्याचे यश आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.
हिंदुस्थानात स्वातंत्र्यासाठी घडलेल्या संग्रामात एवढ्या घटना घडल्या की त्या सर्वच्या सर्व किंवा जशास तशा मांडणे शक्यच नाही. शिवाय तशी नाट्य या संकल्पनेत अपेक्षाही असू नये. नाटक हे दृक् – श्राव्याचे जिवंत स्वरुपाचे माध्यम आहे. प्रेक्षकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, नव्हे असतोच. मला वैयक्तीकरीत्या ज्या गोष्टी भावल्या, त्या मी नमूद केल्या आहेत, पण आणखी काही गोष्टी अपेक्षित होत्या व आहेत, त्या प्रामाणिकपणे लिहाव्याशा वाटतात. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, माझ्या अपेक्षा याला मी या नाटकातील किंवा लेखकाच्या ‘त्रुटी’ समजत नाही.
नाटक चालू असताना अनेक प्रसंगी टाळ्या वाजवायला हव्यात असे वाटूनही वाजवू शकलो नव्हतो, कारण या ‘गतिमान’ नाटकामध्ये टाळ्यांमुळे पुढचे संभाषण मला व माझ्यामुळे इतरांना ऐकू येण्यात अडथळे येतील, म्हणून टाळ्या वाजवण्यात बर्‍याच प्रसंगी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली… असो….
हिंदुस्थानात इंग्रज अवतरल्यानंतर त्यांनी आगमनाचे व्यापारविषयक प्रयोजनाचे इंग्रजीत निवेदन केले. पण एवढ्या झटपट ते एकाला समजले असे दर्शविले आहे. तेथे या प्रसंगी मुक्यांशी हातवारे करून बोलतात तशी प्रसंग निर्मिती हवी होती.
सावरकरांच्या मनांतील केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगातील कोणताही प्रसंग पारतंत्र्यात असता कामा नये ही विचारसरणी प्रखरपणे मांडली आहे. इंग्रज दीडशे वर्षे राहिले, पण तत्पूर्वीपासून हिंदुस्थानाचाच एक भाग असलेला गोमंतक गुलामगिरीत होता. गोमंतकातच अवतरलेल्या या नाटकात पोर्तुगीज-इंग्रज संबंध, गोव्यातील जनतेबद्दल भारतीय क्रांतिकारकांची कमीत कमी मनातील भावना, गोव्यातील व्यक्तींचे नामनिर्देश तरी यायला हवेत. दक्षिण भारतामध्ये क्रांतिवीर फारसे नसतील, पण येथील संस्थानिक, राजे यांचा पुसटसा तरी उल्लेख यायला हवा होता.
भारत ही संतांची भूमी. रामदासांच्या काही काव्यपंक्तींचा उल्लेख नाटकात झाल्याचे स्मरते, पण त्याचवेळी इतरही जे संत-महंत झाले, त्यांचा या नाटकात फक्त कथापोषक असलेला उल्लेख यायला हवा होता.
१५ ऑगस्टच्या पूर्वरात्री नातू-आजोबांच्या संभाषणाने सुरूवात होणारे नाट्य…. आज, कदाचित मागील कोणत्याही वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या वर्णनापर्यंत, शेवटपर्यंत हे नातू-आजोबा आहेत, आजोबा किंवा तत्सम अन्य एखादे पात्र योजून नातवाला पुढील काही गोष्टी सांगू शकले असते…. सांगू शकतात.
इतिहास जशास तसा लिहिला जातो असे नाही, सर्व इतिहास ज्ञात असतोच असेही नाही. काही गोष्टींचे ज्ञान आजही समाजाला होणे आवश्यक आहे. कित्येक गोष्टी आजघडीला समाजाला चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात नव्हे कधी गळीही उतरवल्या जातात. या नाटकातून जर समाजजागृतीचे बाळकडू पाजायचे तर या गोष्टी सहाय्यक ठरू शकतील.
या नाटकातील भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचा माऊंटबॅटनचा प्रसंग उल्लेखनीय आहे, पण ज्या पद्धतीने हा दाखवला त्यामुळे तो तेथे ‘हिरो’ ठरतो. आज भारतात जे काही चालले आहे, प्रामुख्याने काश्मीर प्रश्‍न, काही वर्षांपूर्वीचा बंगालचा फाळणी प्रश्‍न आणि वर्तमानातील कित्येकशा अराजकतेच्या गोष्टी…. हे सारे किंवा सर्वांची खरी ‘मेख’ भारत – पाकिस्तान फाळणीतून घडली आहे हे विचारांती पटल्याशिवाय राहणार नाही.
इंडियन नॅशनल कॉंग्रेस आणि जिनांचे समर्थक यात ब्रिटीशांनी ढवळाढवळ करताना जी शक्कल वापरली, त्या कृष्णकृत्याचे जनक म्हणून माऊंटबॅटनकडे अंगुलीनिर्देश करणे शक्य आहे. फाळणीच्या वेळचा रक्तपात, पंचावन्न कोटींचे कर्ज, सुभाषबाबू मिळाल्यास ब्रिटिशांच्या हवाली करण्याचा करार, चहाच्या मळ्यांचा ताबा इंग्रजांकडे ठेवण्याचा करार…. हे खापर कुणाच्या माथी मारायचे? इंग्रजांनी हे पेरलेले बीज खोल, अगदी मुळाशीच वसले म्हणूनच पुढे गांधीहत्येनंतर परत एकदा रक्तपात घडला. भारताला स्वातंत्र्य मिळूनही निजामांनी काही वर्षे युनियन जॅक फडकावला.
…हा … हा इतिहास कळायला व समजायला हवा.
घटना शिल्पकार आंबेडकरांना अभिप्रेत असलेली संस्कृत ही राष्ट्रभाषा नेहरूंनी नाकारली हे श्रोत्यांना कळायला हवे. आयुर्वेदासारख्याच कित्येक गोष्टींची पिछेहाट करण्यात इंग्रजांचाच हात होता हा इतिहास जुना नाही. त्याचबरोबर मॅक्समुल्लरने लोकमान्यांना मंडालेतून सोडविण्यास राणीला भाग पाडले, इंग्रजी सैन्याच्या शिस्तीचे नीट अवलोकन करूनच ‘आझाद हिंद सेना’ तयार झाली. इंग्रजांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा जर उल्लेख झाला तर इतिहासच समजेल. सावरकर अस्पृश्यांच्या घरी जेवले, लोकमान्यांच्या पार्थिवाला गांधींनी खांदा दिला, अथांग जनसमुदायामुळे गिरगाव चौपाटीवर टिळकांना दहन करण्यास इंग्रजांना परवनागी द्यावीच लागली हा इतिहास ज्ञात हवा. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्याच दिवशी सावरकरांना आमंत्रणपत्र न मिळाल्याचा किंवा ते गैरहजर असल्याचा उल्लेख हवा. मध्य भारतात धुमाकूळ घालणार्‍या ठगांना इंग्रजांनी ठेचून काढले हे कळले म्हणून बिघडणार नाही. मातृभाषा व राष्ट्रभाषा म्हणून फुशारकी मारणार्‍यांना सर्वपल्ली राधाकृष्णन शिकवायला लंडनमध्ये जायचे हा इतिहास गौरवशाली नाही का?
भारतमातेच्या दोन्ही हातांकडे पूर्व व पश्‍चिम पाकिस्तानच्या रचनेचे षड्‌यंत्र इंग्रजांनीच घडवले. या नाटकात भारत-पाकिस्तानच्या फाळणीचा प्रसंग येणे आवश्यक वाटते. हिंदू-मुसलमानांत इंग्रजानी पाडलेली तेढ दोन किंवा भिन्न दिशांना जाणार्‍या पडद्यांयोगे सुंदरपणे या नाटकात दाखवली आहे. तशाच प्रकारची क्लृप्ती वापरून फाळणी प्रसंग व याची चित्रफीत दाखवता आली असती. इतिहासाच्या ज्ञानाने विचारशक्ती जागृती होईलच, पण पेरलेल्या बीजाची जाणीव वारंवार जेव्हा होत राहील तेव्हाच समाज पेटतच जागृत होईल.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी पोर्तुगीज सत्ताधार्‍यांनी पोर्तुगीज ध्वजासोबत भारतीय तिरंगा फडकवण्यास दिलेल्या उल्लेखाने इंग्रज व पोर्तुगीजांच्या मानसिकतेचा विचार करण्यास लावणारा इतिहास प्रेक्षकांना कळला तर कुठे काय कसे बिघडणार?
आज भारतात जी अराजकता माजली आहे, त्याविरुद्ध उठून बंड करून काही विधायक कार्यासाठी समाजपरिवर्तन घडावे हे सूत्र नाटकांत क्रांतिवीरांचा इतिहास दर्शविण्यामागे आहे. आज मात्र आपणाला परकियांविरुद्ध नव्हे तर आपणा-आपणातच समाज परिवर्तन घडवायचे आहे. तौलनिक विचारसरणीने प्रेरित करून क्रांती घडवायची तर इंग्रज असो पोर्तुगीज असो, त्याच्यातील आपणाला उपकृत ठरणार्‍या चांगल्या प्रवृत्ती वगैरे जर इतिहासातून, नाट्यातून ज्ञात झाल्या तर ते यथार्थच होईल.
अर्थात असा काही भाग स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातून दर्शवला तर.. अगदी कालपरवापर्यंतच्या गोष्टी समाविष्ट करता येतील. वारंवार चिरंजिविता येईल. नामनिर्देश आणि आजोबांच्या केवळ वक्तव्याने नाटकाची व्यापकता दरवेळीही वाढवता येईल.
शेवटी मला जे वाटले ते लिहिले. अर्थात वरील अपेक्षित गोष्टी नसल्या म्हणून ‘वंदे मातरम्’ ला कुठेही उणेपणा येत नाही हे परत निर्देशावे असे वाटते. फक्त वरील गोष्टींचा विचार पुनर्लेखनाच्या वेळी केल्यास (माझ्यासारख्या अनेकांच्या विचारसरणीत, मतभेद असतील) त्याच्या सर्वानुमते चर्चायुक्त योग्यायोग्य अंतर्भाव झाल्यास नाट्याविष्काराचा दर्जा उंचवण्यास नक्कीच मदत होईल. वंदे मातरम्!