लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना नोटीस

0
11

विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली असून 15 फेब्रुवारीपर्यंत यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ही नोटीस पाठवली आहे. 7 फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात खोटे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे तथ्य ठेवल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि आचार शाखेच्या उपसचिवांनी राहुल गांधींना ई-मेलद्वारे नोटीस पाठवली आहे. निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली होती. तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांनी केलेले असंसदीय आणि अनादर दर्शवणारी वक्तव्ये, आरोप कामकाजातून काढून टाकण्यात यावेत अशी मागणी केली होती.