लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा ः सरसंघचालक

0
30

>> दसरा मेळाव्यात केंद्राला सूचना

केंद्र सरकारने लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा. धार्मिक आधारावर सुरू असलेल्या असमान प्रजनन दराचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल शुक्रवारी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे झालेल्या दसरा मेळाव्यात श्री. भागवत बोलत होते. सरसंघचालक म्हणाले की, पूर्वोत्तर राज्यांमध्ये धार्मिक आधारावरील असंतुलित लोकसंख्येमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा फायदा घेत बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची आवश्यकता आहे.

देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलताना भागवत यांनी, सागरी टापूंसह सर्व सीमा अधिक मजबूत करायला हव्यात. कलम ३७० रद्द केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, तेथील नागरिकांमध्ये ते भारताचे अंग आहेत ही भावना निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी भागवत यांनी, सर्व मंदिरे ही भाविकांच्या ताब्यात असायला हवी. त्याचे व्यवस्थापन भाविकांनी करायला हवे, असे सांगितले.