पंजाब राज्यातील लुधियानामध्ये काल रविवारी (30 एप्रिल) सकाळी घडलेल्या एका विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत नऊजणांचा मृत्यूझालाअसून 11 जण बेशुद्ध पडले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हा वायूगळती ग्यारसपुरामधील एका रहिवासी इमारतीत सकाळी सव्वासातच्या सुमारास झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन विभागाच्या मदतीने बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटपर्यंतचा परिसर सील केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला. ही घटना घडलेल्या इमारतीत दुग्धकेंद्र आहे. सकाळी दूध नेण्यासाठी या ठिकाणी आलेले नागरिक बेशुद्ध पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वायूगळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आत लोक बेशुद्ध झाले. या घटनेत कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. हा परिसर सील करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लुधियानाच्या ग्यासपुरा इथल्या वायूगळतीच्या घटनेची दखल घेतली आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.