Home Featured लुथरा बंधूसह मूळ जमीनमालकांवर ठपका

लुथरा बंधूसह मूळ जमीनमालकांवर ठपका

0

चौकशी समितीच्या अहवालावर उच्चस्तरीय बैठकीत चर्चा

राज्य सरकारने बर्च नाईटक्लब अग्नितांडव प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात बर्च क्लबच्या आत्ताच्या मालकांबरोबरच (लुथरा बंधू) मूळ जमीनमालक सुनील दिवकर आणि प्रदीप घाडी आमोणकर यांच्यासह हडफडे पंचायतीचे सरपंच आणि तत्कालीन पंचायत सचिवांवर ठपका ठेवला आहे.
हडफडे येथील बर्च नाईटक्बल अग्नितांडव प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने सादर केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीत काल चर्चा केली.

हडफडेचे सरपंच, सचिवांचे बर्च मालकांशी संगनमत होते, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. सरपंचांनी कबूल केले आहे की पंचायतीने क्लबचा परिसर सील केला नाही, तसेच त्यांनी इतर विभागांना त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी आणि त्यांचे कामकाज बंद करण्यासाठी पत्र लिहिले नाही किंवा कळवले नाही. त्यामुळे, मालकांशी त्यांचे नाईटक्लब बेकायदेशीरपणे चालू ठेवण्यात संगनमत असल्याचे सिद्ध होते, त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, असेही अहवालात म्हटले आहे.
बर्च या नाईटक्लबच्या जमीन रूपांतराची महसूल खात्याने चौकशी करावी. बर्च प्रकरणामध्ये अग्निशामक दल, पोलीस, अबकारी, वीज, अन्न आणि औषध प्रशासन, पर्यटन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची शिफारस अहवालात केली आहे.

बर्च या नाईटक्लबचे मूळ मालक सुनील दिवकर आणि प्रदीप घाडी आमोणकर असून, त्यांनी बेकायदा बांधकाम केल्याने या प्रकरणात ते दोषी आहेत. हडफडेचे सरपंच आणि तत्कालीन सचिवांचे बर्च मालकांशी संगनमत होते. त्यामुळे हडफडेचे सरपंच आणि तत्कालीन सचिवांवर कारवाईची करावी, असे अहवालात म्हटले आहे.