लिबियाच्या विमान अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी पत्करली शरणागती

0
100

एकूण ११८ प्रवासी असलेल्या लिबियाच्या एका विमानाचे काल अपहरण करण्यात आले. मात्र काही तासांच्या वाटाघाटी व नाट्यानंतर दोन्ही अपहरणकर्ते सुरक्षा यंत्रणांना शरण आले. माल्टाचे पंतप्रधान जोसेङ्ग मस्कत यांनी ही माहिती दिली. यामुळे सर्व प्रवाशांसह कर्मचार्‍यांचीही सुटका झाली.

लिबियाच्या नैऋत्येकडील सेभा येथून लिबियाच्या सरकारी मालकीच्या ‘आफ्रिकिया एअरवेज’चे ए ३२० प्रकारचे हे विमान त्रिपोलीला चालले होते. आपल्याकडे हातबॉम्ब असून विमान स्फोटात उडवून देण्याची धमकी देत त्याचे अपहरण करण्यात आले. या अपहरणाची माहिती सदर विमानाच्या वैमानिकाने त्रिपोली येथील विमानतळावरील अधिकार्‍यांशी संपर्क साधून दिली.
लिबियाच्या किनार्‍यापासून उत्तरेस सुमारे पाचशे कि. मी. वरील माल्टा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरवण्यात येताच अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी सुरू झाल्या. यावेळी माल्टा विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी ट्वीटरवरून या अपहरणासंबंधीची माहिती ट्वीट केली. या विमानात ११८ प्रवासी व ७ कर्मचारी असून त्यात ८२ पुरूष, २८ महिला व १ अर्भक असल्याची माहिती त्यांनी दिली. माल्टाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने अपहरणकर्त्यांशी बोलणी चालवली.
११८ प्रवाशांपैकी २९ प्रवाशांना नंतर सोडून देण्यात आले.
आपण लिबियाचे माजी सत्ताधीश कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचे समर्थक असल्याचे अपहरणकर्त्यांनी वाटाघाटी करणार्‍यांना सांगितले. २०११ साली गद्दाफींची राजवट उलथवून टाकण्यात आल्यानंतर लिबियामध्ये यादवी माजली आहे. विविध प्रकारचे दहशतवादी गट वेगवेगळ्या भागांवर अधिराज्य गाजवीत आहेत. सरकारी फौजांनी सिर्ते या शहराचा अलीकडेच ताबा घेतला आहे. जून २०१५ पासून ते शहर आयएसआयएसच्या कब्जाखाली होते.
लिबियाच्या पूर्वेच्या भागात मार्शल खलिफा हप्तार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या गटाची राजवट असून बेंगाझीतील दहशतवाद्यांशी त्यांची फौज लढत आहे.