लांच्छन

0
180

म्हादई प्रश्नावर गोव्याचे पाणी पळवणार्‍या कर्नाटकच्या जलसंसाधनमंत्र्यांना अखेर लैंगिक शोषण प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले. सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि त्याची एक सप्रमाण चित्रफीतही बाहेर आली आहे. हा आरोप खरा असेल तर हे कृत्य एवढे घृणास्पद आहे की ह्याला केवळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणे एवढीच शिक्षा पुरेशी नाही. नैतिकतेची बात करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्याने असे हीन कृत्य करावे ही बाब अतिशय लांच्छनास्पद आहे. ‘तो मी नव्हेच’ म्हणत हे महोदय राजीनामा द्यायलाही तयार नव्हते, परंतु अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने भाजपाला हे लोढणे फार महाग पडले असते, त्यामुळे वरून पक्षश्रेष्ठींचा दबाव आल्यानेच हे मंत्रिमहोदय मुकाट राजीनामा देऊन चालते झाले आहेत. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारत असतानाच जर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचे वचनही मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी देऊन टाकले आहे. येडीयुराप्पा सरकारची राजकीय लाचारीच यातून दिसून येते.
राजीनामा द्यावे लागलेले मंत्री हे कर्नाटकच्या राजकारणातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. दोन बंधू भाजपमध्ये, तर दोन कॉंग्रेसमध्ये असल्याने कर्नाटकात सत्ता कोणाचीही असो, मंत्रिपद यांच्याकडे चालून येते असे म्हणतात. कर्नाटकातील जेडीएस – कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेसचे तेरा आमदार आपल्यासोबत घेऊन हे महोदय भाजपामध्ये आले, त्यामुळे त्यांच्या ह्या योगदानाबद्दल पक्षाने त्यांना नव्याने पक्षात येऊनही अगदी ज्येष्ठ मंत्रिपदी नेऊन बसवले. आता ह्या सीडी प्रकरणात मात्र त्यांच्यामुळे पक्षच अडचणीत आला आहे. आता ही चित्रफीत खरी आहे की त्यांना गोत्यात आणण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी हे कुभांड रचले आहे हे पोलीस चौकशीतच सिद्ध होऊ शकते, परंतु ही चौकशी निष्पक्षपणे आणि न्यायालयीन देखरेखीखाली होणे आवश्यक आहे.
कर्नाटकच्या राजकारणातील ही सीडी काही पहिली नव्हे. आजवर अनेक लोकप्रतिनिधींचे अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे बाहेर आलेली आहेत आणि त्यांना राजीनामा देऊन जावे लागले आहे. अगदी राज्याच्या विधानसभेचे कामकाज सुरू असतानाही अश्लील व्हिडिओ पाहणार्‍या नेत्यांचे चित्रण दूरचित्रवाणी वाहिन्यांनी यापूर्वी केले आहेच. हे सगळे पाहिले तर कर्नाटकच्या राजकारणाची पातळी एवढी खालावली आहे का असा प्रश्न पडतो. अर्थात, हे केवळ कर्नाटकातच घडते असे नव्हे, सत्ता आणि संपत्ती जवळ असली की काहींना अस्मान ठेंगणे होते. मग अशी मदोन्मत्त मंडळी आपल्या अधिकाराचा वापर करून कोणत्या थराला जातील नेम नसतो. बेरोजगार तरुणीला नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिचा लैंगिक उपभोग घेतल्याचा सदर आरोप खरा असेल तर अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेल्या गैरप्रवृत्तीला राजकारणातून हद्दपार करण्याची हिंमत भाजपसारख्या सदान्‌कदा नैतिकतेचे पाठ देणार्‍यांच्या पक्षाने दाखवणे अपेक्षित आहे. केवळ राजकीय सोयीसाठी अशी कृत्ये पडद्याआड ढकलून जणू काही फारसे मोठे घडलेलेच नाही असे भासवण्याचा प्रयत्न होऊ नये.
दक्षिणेतील राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. एकीकडे पश्‍चिम बंगालमध्ये आणि दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये दमदार पावले टाकत असतानाच कर्नाटकच्या एका वरिष्ठ मंत्र्याचे हे प्रकरण पक्षासाठी निश्‍चितच हानीकारक आहे. त्यामुळे ह्या प्रकरणातील सत्य समोर आणून सदर मंत्री दोषी आढळल्यास अशा घृणास्पद प्रकारांची पुनरावृत्ती करण्यास कोणीही कुठेही पुन्हा धजावू नये अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा राजकीय तडजोडीपोटी लपवाछपवी झाल्यास त्याचे लांच्छन पक्षावरही आल्यावाचून राहणार नाही.