ऋषभ ठरला टीम इंडियाचा तारणहार

0
180

>> भारत ८९ धावांनी आघाडीवर

>> पंतचे तिसरे कसोटी शतक

>> सुंदरचे नाबाद अर्धशतक

भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसअखेर ७ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे मायभूमीतील पहिले कसोटी शतक व अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने पाहुण्यांवर ८९ धावांची मौल्यवान आघाडी घेतली आहे.

पहिल्या दिवसाच्या १ बाद २४ धावांवरून काल पुढे खेळताना पुजारा व रोहित यांनी कुर्मगती फलंदाजी केली. याचा लाभ उठवत इंग्लंडने टीम इंडियावर दबाव टाकला. तब्बल ६६ चेंडू खेळून अवघ्या १७ धावा करत पुजारा पायचीत झाला. पहिल्या दिवसअखेर पुजारा ३६ चेंडूंत १५ धावा करून नाबाद होता. काल त्याने तब्बल ३० चेंडू खेळून आपल्या धावसंख्येत केवळ दोन धावांची भर घातली. यानंतर कर्णधार कोहलीला खातेदेखील उघडता आले नाही. मालिकेत दुसर्‍यांदा कोहली शून्यावर बाद झाला. बेन स्टोक्सचा उसळता चेंडू खेळण्याच्या नादात यष्टिरक्षक फोक्सकडे त्याने सोपा झेल दिला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली.

स्थिरावल्यानंतर त्याने वैयक्तिक २७ धावांवर आपली विकेट फेकली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिमाखदार ११२ धावांची खेळी केल्यानंतर रहाणेची अपयशाने पाठ सोडलेली नाही. यानंतर फलंदाजी केलेल्या दहा डावांत २२.६च्या सरासरीने त्याला केवळ २२६ धावा करता आल्या आहेत. चौथ्या गड्याच्या रुपात रहाणे परतला त्यावेळी भारताची ४ बाद ८० अशी दयनीय स्थिती झाली होती. अर्धशतकाकडे वाटचाल करत असलेल्या रोहित शर्माला स्टोक्सने पायचीत करत टीम इंडियाला पाच बाद १२१ असे संकटात टाकले. यावेळी इंग्लंडला भारताचा डाव झटपट गुंडाळून किमान नाममात्र आघाडी घेण्याची संधी चालून आली होती. परंतु, ऋषभ पंतने इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. त्याने आपले तिसरे व मायभूमीवरील पहिलेच कसोटी शतक लगावताना १०१ धावांची खेळी केली. केवळ ११८ चेंडूंचा सामना करताना त्याने १३ चौकार व २ षटकारांसह आपली शतकी खेळी सजवली. वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ६०) याच्यासह त्याने सातव्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचत भारताला आघाडी मिळवून दिली. पंत परतल्यानंतर इंग्लंडच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. पण, सुंदर याने कसोटीत तिसर्‍यांदा अर्धशतकी वेस ओलांडताना इंग्लंडला हैराण केले. अक्षर पटेलसह त्याने ३५ धावांची अविभक्त भागीदारी करत भारताला तीनशेच्या जवळ नेऊन ठेवले आहे.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद २०५
भारत पहिला डाव (१ बाद २४ वरून) ः रोहित शर्मा पायचीत गो. स्टोक्स ४९, चेतेश्‍वर पुजारा पायचीत गो. लिच १७, विराट कोहली झे. फोक्स गो. स्टोक्स ०, अजिंक्य रहाणे झे. स्टोक्स गो. अँडरसन २७, ऋषभ पंत झे. रुट गो. अँडरसन १०१, रविचंद्रन अश्‍विन झे. पोप गो. लिच १३, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ६०, अक्षर पटेल नाबाद ११, अवांतर १६, एकूण ९४ षटकांत ७ बाद २९४
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन २०-११-४०-३, बेन स्टोक्स २२-६-७३-२, जॅक लिच २३-५-६६-२, डॉम बेस १५-१-५६-०, ज्यो रुट १४-१-४६-०

अँडरसनचे ९०० बळी पूर्ण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० किंवा अधिक बळी घेणारा जेम्स अँडरसन हा जगातील केवळ तिसरा जलदगती गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (९४९) व पाकिस्तानच्या वसीम अक्रम (९१६) या दोघांच जलदगती गोलंदाजांना हा टप्पा पार करणे शक्य झाले आहे. फिरकीपटूंमध्ये मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका, १३४७), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया, १००१) व अनिल कुंबळे (भारत, ९५६) यांनी ९०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.