>> संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी
फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी बंगळूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या अमीरसोहेल शकीलसाब सनदी (27) याची काल चौदा दिवसांसाठी न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली.
बेळगावातील खडेबाजार परिसरात 15 फेब्रुवारीला दुपारी माजी आमदार लवू मामलेदार यांच्या कारची रिक्षाला किरकोळ धडक बसल्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीनंतर मामलेदार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी रिक्षाचालक अमीरसोहल सनदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मामलेदार यांच्या पार्थिवाचे बेळगावातील इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्हिसेरा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतर मामलेदार यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी अमीरसोहेल सनदी याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 126 (2), 152 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.