लक्ष काश्मीरकडे

0
97

जम्मू आणि काश्मीरला आता निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. पुराने वाताहत झालेले श्रीनगर आणि काश्मीर खोरे आता सावरले आहे आणि पुन्हा उभे राहू लागले आहे. पूरग्रस्त काश्मीरवासीयांना केंद्र शासनाने घसघशीत मदत केली. लष्कराने त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे या सार्‍या मदतकार्याचा फायदा आपल्याला मिळेल या अपेक्षेत भारतीय जनता पक्षानेही काश्मीरच्या निवडणुकीत झोकून दिले आहे असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त काश्मीरला सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली आणि वेळोवेळी कोट्यवधींची आर्थिक मदतही बहाल केली. देशात अजूनही मोदी लाट आहे हे महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांत नुकतेच दिसून आले असल्याने काश्मीरमध्ये – म्हणजे विशेषतः जम्मूमध्ये ही मोदी लाट भाजपच्या पारड्यात घसघशीत मते टाकील अशी पक्षनेत्यांची अपेक्षा दिसते. सर्वांत बिकट स्थिती आहे ती सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्लांची. श्रीनगरला पुराने वेढले तेव्हा प्राण संकटात सापडलेल्या काश्मिरी जनतेला त्यांनी व त्यांच्या सरकारने वार्‍यावर सोडून दिले अशी एकंदरित जनभावना आहे आणि तो राग अजूनही शमलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतही उमर आणि त्यांच्या पक्षाला जबर फटका बसू शकतो. स्वतः उमर अब्दुल्ला हे आपल्या गंदेरबल या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास कचरत असल्याचे दिसते. वास्तविक त्यांचा तो पारंपरिक मतदारसंघ. परंतु गेल्या पुरामध्ये गंदेरबलची वाताहत झाली. त्यामुळे आता कोणत्या तोंडाने मतदारांपुढे जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. कॉंग्रेस यावेळी नॅशनल कॉन्फरन्सशी युती करावी की करू नये याबाबत अद्याप संभ्रमित दिसते. कॉंग्रेसची देशभरात वाताहत सुरू असल्याने काश्मीरमध्ये तरी आपल्या पक्षाचे अस्तित्व दिसावे असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र पूरग्रस्तांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची कशी हुर्यो उडवली ते अजून विस्मरणात गेलेले नाही. जम्मू काश्मीरच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे पीडीपी. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याने काश्मीर खोर्‍यातील जागा पटकावल्या. यावेळी विधानसभेत सत्ता हस्तगत करायची असेल तर केवळ काश्मीरमधील जागा मिळवणे पुरेसे नाही, तर जम्मूमध्येही प्रभाव दिसला पाहिजे हे पीडीपी नेत्यांनी जाणले आहे. त्यामुळे जम्मूतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पीडीपी प्रयत्न करील. हे सर्व पक्ष अद्याप तरी स्वबळावर निवडणूक लढवण्यास पुढे सरसावलेले आहेत. त्यामुळे या रणधुमाळीची फलनिष्पत्ती काय होईल हे सांगणे अवघड आहे. जम्मूमध्ये भाजपला यावेळी मोठी संधी आहे. पाकिस्तानने सीमेवर चालवलेला सततचा गोळीबार, केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी, काश्मीरसाठी नरेंद्र मोदींनी वेळोवेळी केलेली मदत या सर्वांचा परिणाम जम्मू आणि लडाखमध्ये दिसावा यासाठी भाजपने शिकस्त चालवलेली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यासाठी करण्याची रणनीती पक्षाने आखलेली आहे. फुटिरतावादी नेत्यांची परिस्थितीही सध्या बिकट आहे. काश्मीरला पुरातून तारण्यासाठी भारतीय लष्करच पुढे सरसावले होते. तेव्हा यासिन मलिक प्रभृती फुटीर नेते मदतकार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत होते. लष्कराच्या आणि एनडीआरएफच्या होड्या पळवणे, त्यांची नासधूस करणे, दगडफेक करणे असले प्रकार त्यावेळी झाले. पण त्याविषयी आम काश्मिरी जनतेमध्ये नाराजी आहे. भारतीय लष्कराने आपले प्राण वाचवले याविषयी काश्मिरी जनता कृतज्ञ आहे. त्यामुळे या वातावरणाला कलुषित करून मतदानावर बहिष्कार घालण्यास जनतेला चिथावण्याचा प्रयत्न फुटीर नेते करून पाहतील, परंतु त्याला किती भीक घालायची याचा विचार खरे तर काश्मिरी जनतेने करायला हवा. सीमेपलीकडून यच्चयावत पाकिस्तानी नेते फुटीरतावादी काश्मिरींना आपले पाठबळ देऊन त्यांचे खचलेले मनोधैर्य उंचावण्याच्या कामी लागलेले आहेत. पोरसवदा बिलावल भुत्तोपासून परवेझ मुशर्रफपर्यंत सार्‍यांची चिथावणीखोर वक्तव्ये, खुद्द नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांत आळवलेला काश्मीरचा राग हे सारे प्रयत्न काश्मीरमधील फुटीर भावना धगधगत ठेवणे यासाठीच केलेला अट्टहास होता. निवडणुका सुव्यवस्थितरीत्या पार पडल्या तर तो पाकिस्तानचा पराभव ठरेल. त्यामुळे त्यात विघ्न आणण्याचे आटोकाट प्रयत्न यावेळी होतील. पण त्यांना भीक न घालता काश्मीरमधील लोकशाहीचा गजर बुलंद व्हावा लागेल आणि ही जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांची आहे.