लंकेच्या कर्णधारपदी थिसारा परेरा

0
113

श्रीलंका क्रिकेट मंडळाने बुधवारी उपुल थरंगा याची कर्णधारपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करताना भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय व टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अष्टपैलू थिसारा परेरा याची कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे. थरंगा व श्रीलंकेच्या अनेक अनुभवी खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे थरंगाला कर्णधारपदावरून हटविण्यात आल्याचे मानले जात आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली श्रीलंकेच्या संघाची कामगिरीदेखील सुमार झाली असून त्यांना भारत, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानविरुद्ध एकही सामना जिंकता आला नव्हता. २००९ साली पदार्पण केल्यानंतर थिसाराला श्रीलंका संघाचा नियमित सदस्य कधीही बनता आले नाही. १२५ वनडे सामन्यांनंतर फलंदाजीची स्ट्राईकरेट १०९ अशी उत्तम असली तरी त्याची सरासरी केवळ १७ आहे. गोलंदाज म्हणून ३२.६२च्या सरासरीने १३३ बळी घेत प्रभाव पाडला आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १० डिसेंबर रोजी धर्मशाला येथे सुरुवात होणार आहे. यानंतर चंदीगड (१३ डिसेंबर) व विशाखापट्टणम (१७ डिसेंबर) रोजी उर्वरित दोन सामने होतील. २०, २२ व २४ डिसेंबरला कटक, इंदूर व मुंबईत तीन टी-२० सामने खेळविण्यात येतील.