रॉयल्टी न भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीस परवानगी देणार

0
114

>> राज्यात आहे रॉयल्टी न भरलेले ९.५ दशलक्ष टन खनिज

सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी लागू करण्यापूर्वी उत्खनन केलेले, तथापि, रॉयल्टी न भरलेल्या खनिजाची रॉयल्टी वसुल करून वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार आहे. राज्यात रॉयल्टी न भरलेले सुमारे ९.५ दशलक्ष टन खनिज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे राज्यातील खाण क्षेत्र, जेटीवर असलेल्या रॉयल्टी भरलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. रॉयल्टी भरलेल्या खनिज कंपन्यांनी खनिजाची वाहतूक करण्यास मान्यता देण्यासाठी खाण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत. या अर्जावर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. सुमारे १.४४ दशलक्ष टन खनिजाची वाहतूक केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
खाण बंदीच्या पूर्वी उत्खनन करण्यात आलेले परंतु रॉयल्टी न भरलेल्या खनिजाची रॉयल्टी भरून घेऊन वाहतूक करण्यास मान्यता दिली जाणार आहे.

मलंग चित्रपटातून
गोव्याची चुकीची प्रतिमा
राज्यात सिनेमाच्या शुटिंगसाठी मान्यता देण्यापूर्वी सिनेमाच्या कथानकाचा अभ्यास गोवा मनोरंजन संस्थेकडून केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. मलंग सिनेमामधून गोव्याची चुकीची प्रतिमा रंगविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. गोवा मनोरंजन संस्थेकडून सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मान्यता देण्यापूर्वी सिनेमाच्या कथानकाचा अभ्यास केला जाणार आहे. सिनेमात गोवा कसा दाखवला जाणार हे पाहूनच परवानगी दिली जाणार आहे. गोव्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. इतर चांगल्या गोष्टी आहेत. अमलीपदार्थ व इतर गोष्टी दाखवून गोव्याची प्रतिमा मलिन करणे चुकीचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.