>> केंद्र सरकारकडून उपाययोजना; एआयची मदत घेणार
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण त्यात जखमी झाले होते. कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चेंगराचेंगरीसारख्या घटना पुन्हा घडू नये किंवा अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने देशातील 60 प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’ तयार करण्याची योजना आखली आहे. तसेच देशातील 60 पेक्षा जास्त रहदारीच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात येणार आहेत. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ‘एआय’ची देखील मदत घेतली जाणार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, रेल्वेने 26 फेब्रुवारीपर्यंत दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत काउंटरवरून प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली आहे.
चेंगराचेंगरीसारख्या घटना पुन्हा घडू नये किंवा अशा घटना टाळण्यासाठी होल्डिंग झोनबरोबरच ‘एआय’तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. विशेषतः ट्रेनच्या विलंबाच्या वेळी हा वापर करण्यात येणार आहे.