रेल्वेला आग लावल्याप्रकरणी संशयिताला रत्नागिरीत अटक

0
8

केरळमधील अलप्पुझाहून कन्नूरला जाणाऱ्या रेल्वेला आग लावल्याप्रकरणी शाहरुख सैफी या आरोपीला रत्नागिरी -महाराष्ट्र येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुखला मंगळवार-बुधवारी मध्यरात्री महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. आरोपीच्या डोक्याला व चेहऱ्यावर जखमा झाल्या असून तो रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. केरळ पोलिसांचे एक पथक रत्नागिरीत पोहोचले आहे. ते त्याला केरळला घेऊन जातील. शाहरुख हा दिल्लीच्या शाहीन बागचा रहिवासी आहे. तपासासाठी केरळ पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी देखील पोहोचले होते.
रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या डी-1 कोचला शाहरुख सैफीने आग लावली आणि अनेक प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ फेकले. कोझिकोडमधील एलाथूरजवळ ही घटना घडली. या घटनेत एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेत आणखी 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी फक्त एकाची प्रकृती चिंताजनक आहे.