40 पेक्षा अधिकजणांची पोलिसांकडून चौकशी
विरोधकांची सरकारवर जोरदार टीका
गंभीर दखल ः मुख्यमंत्री
बायणा येथील सशस्त्र दरोडा प्रकरणी 36 तास उलटले, मात्र अद्याप तपास लागू शकलेला नाही. दरोडेखोर परराज्यांत गेले असावेत, या शक्यतेसोबत त्यांना स्थानिक पातळीवर आसरा मिळाला आहे का, अशा दिशेनेही तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 40 हून अधिक जणांना पोलिस स्थानकावर आणून चौकशी करण्यात आली आहे अशी माहिती मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.
बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये मंगळवारी दरोड्याची घटना घडली. यात सागर नायक यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीला बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी रोख रक्कमेसह लाखोंचा ऐवज लुटून नेला. या घटनेला 36 तास उलटले तरी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर नायक यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत पोलिसांनी अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र अजून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलेले नाही. मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास सातजणांच्या टोळीने फ्लॅटमध्ये शिरून तिघांना मारहाण करत 45 लाखांचा ऐवज लुटून नेला. हे चोरटे इमारतीच्या मागच्या बाजूने आले व लिफ्टने सहाव्या मजल्यावर पोहोचले. चोरट्यांनी सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये शिरण्यापूर्वी शेजाऱ्यांचे फ्लॅट बाहेरून बंद केले होते. मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या सातजणांच्या टोळीचा इमारत परिसरातील वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्याशी संपर्क साधला अशता त्यांनी, दरोड्याच्या घटनेचा सर्व मार्गानी तपास केला जात आहे. सागर यांचे आईस्क्रीम पार्लर होते, त्यामुळे तिथे कामाला असणाऱ्या कामगारांची चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 40 हून अधिकजणांना पोलिस स्थानकावर आणून चौकशी करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली असून लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, गोवा हे गुन्हेगारांची राजधानी होत चालली असल्याची टीका दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल केली. त्यांनी बायणा येथील ‘चामुंडी आर्केड’ इमारतीत जाऊन दरोडा पडलेल्या फ्लॅटची पाहणी केली. सशस्त्र गुन्हेगार आता सहजतेने घरांमध्ये घुसून दहशत निर्माण करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार ः काँग्रेस
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्याकडे गोवा सरकार ताबडतोब बरखास्त करावे, अशी मागणी करणार असल्याचे काल काँग्रेस पक्षाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी, गोव्यात दरोडे, चोऱ्या, खून, गँगवार अशा घटना घडत असताना या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त केले जावे, अशी मागणी आम्ही राज्यपालाकडे करणार आहोत असे सांगितले.
काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनीही राज्यातील भाजप सरकार बरखास्त केले जावे अशी मागणी काँग्रेस पक्ष राज्यपालांकडे करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अमित पाटकर यांनी, दोनापावला, म्हापसा व त्यानंतर आता बायणा येथे दरोड्यााच्या घटना घडल्या. मात्र, या दरोडेखोरांना पकडण्यास गोवा पोलिसांना पूर्ण अपयश आले आहे. राज्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंगल्यांवर दरोडे घालणारे दरोडेखोर आता इमारतींतील फ्लॅटमध्ये घुसून दरोडा घालण्याचे धाडस करू लागले असून त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हे असेच चालू राहिल्यास पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील, असे सांगून कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा न झाल्यास पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.
आमदार कार्लुस फेरेरा यांनी, राज्य सरकारला जनतेला सुशासन व संरक्षण देण्यास अपयश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीची एक मालिकाच सुरू झाली असल्याचे दृष्टीस आणून दिले. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक व भीती राहिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने पोलिसांना काम करण्यास मोकळीक द्यावी, अशी मागणी फेरेेरा यांनी यावेळी केली.