रेरा : प्रकल्प नोंदणीसाठी तिसर्‍यांदा मुदतवाढीचा आदेश

0
84

गोवा रियल इस्टेट रेग्युलेटरी (रेरा) प्राधिकरणाने राज्यात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी तिसर्‍यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा आदेश काल जारी केला आहे.

२ जुलै २०१८ ते १ ऑक्टोबर २०१८ या तीन महिन्यांत नोंदणी करणार्‍यांकडून ३ लाख रुपये दंड वसूल करून नोंदणी करून घेतली जाणार आहे. यासंबंधीचा आदेश नगरविकास खात्याच्या संचालिका आर. मेनका यांनी २७ जूनला जारी केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीसाठी निर्धारित केलेली मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा २३ फेब्रुवारी २०१८ रोजी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर २ एप्रिल २०१८ रोजी दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली. २ लाख रुपये दंड आकारून १ जुलै २०१८ पर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती.

रेरा प्राधिकरणाकडे प्रकल्प नोंदणीसाठी बांधकाम व्यावसायिक व कंपन्यांकडून अर्ज सादर केले जात आहे. आत्तापर्यंत सुमारे २१२ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसेच ८६ एजंटना मान्यता दिली आहे. रेराने मान्यता दिलेले प्रकल्प आणि एजंट यांची सविस्तर माहिती रेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.