भाजपची अघोषित आणीबाणी सरदेसाईंना दिसत नाही का?

0
77

>> देशप्रभूंचा नगरविकासमंत्र्यांवर हल्लाबोल

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर टीका करणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना भाजपची अघोषित आणीबाणी दिसत नाही का? असा सवाल कॉंग्रेसचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये आणीबाणीचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी करून भाजपच्या सुरात सूर मिसळलेल्या मंत्री सरदेसाईंवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे. तसेच निवडणूक घेतल्यास पराभूत होणार हे माहीत असूनसुद्धा लोकशाहीच्या पुनरुत्थानासाठी इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेतला होता. देशात लादलेल्या आणीबाणीबाबत इंदिरा गांधी यांनी देशवासीयांची माफीसुद्धा मागितली आहे, असेही देशप्रभू यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकांमध्ये केवळ देशातील आणीबाणीचा इतिहास कशासाठी असा प्रश्‍न त्यांनी केला. गुजरातमधील गोध्राकांड, यूपीतील हॉस्पिटलमधील गॅसच्या अभावी ३६ मुलांचा दुर्दैवी अंताचा विषय, तसेच भाजपच्या राजवटीतील अनेक प्रकरणे पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केली पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. गोवा फॉरवर्डने मतदारांशी प्रतारणा करून भाजपला पाठिंबा दिला आहे. गोवा फॉरवर्डने आपल्या निवडणूक वचननाम्यावर बोलावे असेही देशप्रभू यांनी सांगितले.