रुग्ण वाढू लागले

0
107

शेजारच्या महाराष्ट्रातील – विशेषतः मुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. त्यामुळे ही अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनसंदर्भात विचार करावा लागेल असे सूतोवाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याच अर्थाचे वक्तव्य केले आहे आणि येत्या काही दिवसांत आढावा बैठक घेऊन त्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अर्थात, संपूर्ण लॉकडाऊनचे किती भयावह परिणाम अर्थव्यवस्थेवर घडून येतात याचा अनुभव असल्याने यापुढील काळात कोणीही संपूर्ण लॉकडाऊनचे समर्थन करणार नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही अशा तर्‍हेने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याकडे यापुढे सरकारांचा कल राहील. म्हणजे उदाहरणार्थ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आदींवर बंधने येतील, परंतु लोकांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर सहसा गदा आणली जाणार नाही. महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन जारी केले आहे. नाशिकमध्ये पंधरा मार्चनंतर लग्नसोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ठाण्यातील अकरा हॉटस्पॉटस्‌मध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. औरंगाबादेत रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत नाईट कर्फ्यू आहे. अशा प्रकारे स्थानिक पातळीवर निर्बंध घालून तरी कोरोना आटोक्यात येईल का हे पाहिले जात आहे. महाराष्ट्र हे आपले अगदी शेजारी राज्य असल्याने आणि मुंबई हे गोव्याचे हवाई व रेल प्रवेशद्वार असल्याने तेथील परिस्थितीकडे गोवा कानाडोळा करू शकत नाही आणि केला तर ते परवडणारे नसेल. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीनुसार गोव्याने वेळीच जागे होणे जरूरी आहे.
गोव्यातील कोरोना रुग्णसंख्याही हळूहळू वाढू लागली आहे. काल नवे ७३ रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसांतील गोव्यातील रुग्णांचे प्रमाण अभ्यासले तर असे दिसते की सर्वाधिक रुग्ण हे पणजी शहरात व आजूबाजूच्या परिसरात सापडले आहेत. त्या खालोखाल मडगाव, फोंडा, म्हापसा आदी शहरांचा क्रम लागतो. हे रुग्ण वाढण्यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण ठरले आहे ते सध्याचे लग्नसोहळे. एकेका लग्नात डझनावारी लोक कोरोनाबाधित झाल्याची उदाहरणे आहेत. त्यातही सुशिक्षित वर्गाच्या लग्नसोहळ्यांमध्येही अशा प्रकारे कोरोनाचा फैलाव झाल्याचे आढळलेले आहे. त्यामुळे सरकारला आणि जनतेला कोरोनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर लग्नसोहळ्यांसंदर्भात खबरदारी घेणे अत्यावश्यक असेल. कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असलेले दुसरे क्षेत्र म्हणजे शिक्षणक्षेत्र. एकीकडे राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असताना गोवा विद्यापीठाला एकाएकी द्वितीय शैक्षणिक सत्र ऑफलाइन घेण्याची कोणती दुर्बुद्धी झाली आहे? हा विद्यार्थ्यांना नाहक पुन्हा कोरोनाच्या जबड्यात फेकण्याचा प्रकार होईल. त्यामुळे यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप करून तूर्त हा प्रस्ताव स्थगित ठेवावा.
आज राज्यामध्ये कोरोनाचे अस्तित्व विसरून अगदी बेपर्वाईने सारे कारभार चाललेले दिसतात. विशेषतः गोव्याबाहेरून येणार्‍या पर्यटनांना ना कोणाचा धाक, ना कसली भीती. त्यामुळे विनामास्क, विना सामाजिक अंतर फिरणारी मंडळी सर्रास सर्वत्र दिसून येते. पर्यटनाला चालना देण्याच्या नादात सरकारचा ह्याकडे अक्षम्य कानाडोळा चाललेला आहे. त्याचे परिणाम मात्र स्थानिक जनतेला भोगावे लागू शकतात. सध्याचे दिवस तर निवडणुकीचे आहेत. नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या नादात कोरोनाविषयक निर्बंधांचा विसर पडू नये याचीही खबरदारी नेत्यांनी स्वतः घेणे आवश्यक आहे. अजून कोरोना गेलेला नाही. तो आपल्या अवतीभवती दबा धरून बसलेला आहे हे भान सोडून कसे बरे चालेल?