राहुल गांधींबरोबर आज कॉंग्रेस आमदारांची बैठक

0
68

कॉंग्रेसचे काही आमदार फुटण्याच्या वाटेवर असल्याने अखिल भारतीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षांसह सर्व आमदारांना तातडीने दिल्लीत बोलावले आहे. त्यांची आज दुपारी ३.३० वाजता राहुल यांच्याबरोबर बैठक होणार आहे. प्रदेश अध्यक्ष लुईझिन फालेरो काल दिल्लीला रवाना झाले असून कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी बैठकीवर बहिष्कार घालणार असल्याचे म्हटले आहे.

आमदार मडकईकर यांनी अद्याप कॉंग्रेस पक्ष सोडलेला नसला तरी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडच्या काळात कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी घेतलेल्या बैठकांना आमदार मडकईकर यांच्यासह अनेक आमदारांनी दांडी मारलेली आहे. दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनी यापूर्वीच कॉंग्रेसपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस सोडण्याबाबत केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
चार दिवसांपूर्वी अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी गोव्यात येऊन आमदार व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती. प्रत्येक आमदारांना भेटून त्यांनी येथील राजकीय स्थितीची माहिती करून घेतली होती. सिंह यांनी पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर केल्यानेच राहुल यांनी वरील नेत्यांना बैठकीसाठी बोलावले आहे, असे पक्षाचे नेते एम. के. शेख यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धोरण निश्‍चित करून पुढील कृती कार्यक्रम ठरविण्याच्या बाबतीत आज गांधी यांच्याबरोबर होणार्‍या बैठकीस बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक कॉंग्रेस नेते भाजप सरकारच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने भाजपवर आरोपपत्रही सादर केले होते. या आरोपपत्राच्या प्रती तळागाळात पोचवण्याचे उद्दिष्ट कॉंग्रेसने ठेवले आहे.