बोथट आरोप

0
89

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर विविध आरोप करणारे ‘परिवर्तन ते यू टर्न’ हे आरोपपत्र कॉंग्रेसच्या वतीने नुकतेच जारी करण्यात आले. हे आरोपपत्र जारी होत असताना अनुपस्थित असलेल्या व अन्य पक्षांच्या वळचणीला जाण्याच्या वाटेवर असलेल्या कॉंग्रेस आमदारांचा उल्लेख करीत भाजपाने त्याला प्रत्युत्तरही दिले. या आरोपपत्राला जनतेने गेल्या लोकसभा निवडणुकीतच उत्तर दिले आहे असे भाजपाचे म्हणणे आहे. खरे तर कॉंग्रेसला बरीच उशिरा जाग आली असे दिसते. गेली साडे चार वर्षे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसचे अस्तित्व ना विधानसभेत दिसले, ना मैदानावर. विधानसभेमध्ये अपक्ष आमदारांनीच प्रमुख विरोधकाची भूमिका स्वीकारून वेळोवेळी सरकारविरुद्ध दंड थोपटले. कोंडीतही पकडले. कॉंग्रेसची आमदार मंडळी मात्र वेळोवेळी सोईस्कर मौन स्वीकारून शांतच राहिली. आता निवडणूक तोंडावर आल्यावर पक्षाला जाग आली आहे. महागठबंधनच्या विषयावरून पक्षांतर्गत बेदिली एव्हाना पुरती चव्हाट्यावर आलेली आहे, परंतु दिखाव्यापुरते का होईना एकत्र येत हे आरोपपत्र कॉंग्रेसने जारी केले आहे. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे वास्तविक कॉंग्रेसचे कर्तव्यच होते. सुदृढ लोकशाहीसाठी ते अत्यावश्यकही आहे, परंतु गेली साडे चार वर्षे पक्षनेते गप्प का होते याचे उत्तरही कॉंग्रेसकडून अपेक्षित आहे. भ्रष्टाचारापासून वाढत्या अमली पदार्थ व्यवहारापर्यंत असंख्य आरोप कॉंग्रेसने विद्यमान सरकारवर केले आहेत. परंतु जेव्हा आपण दुसर्‍याकडे बोट दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे वळत असतात या म्हणीचा प्रत्ययच कॉंग्रेसचे हे आरोपपत्र वाचताना येतो. भ्रष्टाचाराची बात करणार्‍यांच्या मानगुटीवर ‘जायका’ चे भूत आहे हे जनतेला माहीत नाही का? नोकर्‍यांचा बाजार या सरकारने मांडल्याचे कॉंग्रेस म्हणते, परंतु २०१२ साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस सरकारने दुसरे काय चालवले होते? माध्यम प्रश्न वा कॅसिनोवरून सरकारवर तोफा डागणे म्हणजे तर स्वतःवरच घाव घालण्यासारखे आहे, कारण हे दोन्ही प्रश्न निर्माण झाले ते कॉंग्रेसच्याच काळात. अमली पदार्थांचा विळखा गोव्याला पडल्याचे अक्राळविक्राळ रूपात समोर आले तेव्हाही कॉंग्रेसच सत्तेवर होती. विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन सोनिया गांधींनी आपल्या गोव्यातील सभेत दिले होते. त्यामुळे आरोपांची ही अस्त्रे डागण्याआधीच निकामी झाली आहेत असे म्हणणे भाग आहे. निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी कॉंग्रेसची एकंदर स्थिती ही विस्कळीत आणि विघटित आहे. केवळ गोव्यातच हे असे आहे असे नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये कॉंग्रेस पक्ष आज निर्नायकी अवस्थेत दिसतो आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ज्यांनी पक्षनेतृत्वाची सूत्रे स्वीकारायची ते राहुल गांधी कोणत्या विश्‍वात वावरतात ते त्यांनाच ठाऊक नसावे. ‘हिट अँड रन’ स्वरूपाची त्यांची राजकारण शैली परिपक्व नेतृत्वाकडे त्यांना घेऊन जाणारी नाही. या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह गोव्यात पक्षाची मोट बांधू पाहात असले, तरी लवकरच पक्षाचे काही आमदार अन्य पक्षांची जहाजे पकडतील अशी चिन्हे दिसत आहेत. ही परिस्थिती काही भूषणावह आहे असे म्हणता येत नाही. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने जारी केलेले आरोपपत्र पक्ष जागा असल्याची आणि विरोधाची धुगधुगी कायम असल्याची साक्ष देण्यासाठी उपकारक असले, तरी त्यातून या पक्षाचा पर्याय म्हणून जनतेने विचार का करावा याचे उत्तर काही मिळत नाही. आरोपपत्रातील मुद्दे पटले तरी जनता ‘तुम्ही तरी कुठे वेगळे आहात?’ असे विचारल्याविना राहणार नाही. त्याचे काय उत्तर कॉंग्रेस नेते देणार आहेत?