राष्ट्रपतींच्या हस्ते होणा नव्या राजभवनची पायाभरणी

0
37

>> घटक राज्य दिन सोहळ्यासाठी रामनाथ कोविंद ३० मे रोजी गोव्यात

गोवा राज्याच्या येत्या ३० मे रोजी होणार्‍या ३५ व्या घटक राज्य दिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते दोनापावला येथे राजभवनाच्या परिसरात नवीन राजभवन इमारतीची पायाभरणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्याचा ३५ वा घटक राज्य दिन सोहळा राजभवनातील नवीन दरबार सभागृहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या ३५ मान्यवरांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. या सन्मानमूर्तींमध्ये १३ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. काही माजी मुख्यमंत्र्याचा मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. तसेच राज्यातील उद्योग व इतर क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींचाही सन्मान केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोनापावला येथे राजभवनाच्या आवारात नवीन राजभवन बांधण्यात येणार आहे. राजभवनाची सध्याची इमारत कायम ठेवली जाणार आहे. राज्यपालांकडून त्या इमारतीच्या वापराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नवीन राजभवन इमारतीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तयार करण्यात आलेला आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

२५ मे रोजी प्रेरणा दिन
राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यातर्फे बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रेरणा दिन पाळण्यात येणार आहे. यानिमित्त मिनेझिस ब्रागांझा सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उटा या संघटनेने मे २०११ मध्ये विविध मागण्यांसाठी छेडलेल्या आंदोलनावेळी एसटी समाजातील मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या युवकांचा बळी गेला होता. त्यांच्या स्मरणार्थ प्रेरणा दिन साजरा केला जातो.

या प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी समाजातील शिक्षण, संस्कृती, क्रीडा, शेती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या चार मान्यवरांचा आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा पुरस्कार रोहिदास मडकईकर (शेती), सातू ऊर्फ सतीश भिवा वेळीप (शिक्षण), गोविंद शिरोडकर (संस्कृती) आणि प्रतीक्षा गावणेकर (क्रीडा) यांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
या प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, कुठ्ठाळीचे आमदार आन्तोंन वाझ, एसटी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव रवी धवन, प्रकाश वेळीप उपस्थित राहतील.