रावणफोंडमध्ये स्थानिकांच्या जाळपोळ रास्ता रोकोनंतर पोलिसांचा लाठीमार

0
98

>>जमावाच्या दगडफेकीत चार पोलीस जखमी : तिघांना अटक

रावणफोंड-दिकरपाल येथे काल रात्री ८.४५ वा.च्या सुमारास पूर्ववैमनस्य असलेल्या स्थानिकांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक निमित्तावरून मारहाण, मालमत्तेची नासधूस, वाहनांची जाळपोळ अशा घटना घडल्या. सुमारे ४०० जणांच्या जमावाने रास्ता रोकोही केले. यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला. मात्र त्यांच्यावरही गावकर्‍यांनी दगडफेक केल्यानंतर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. रात्री ११.३० पर्यंत ही धुमश्‍चक्री सुरू होती. लाठीमारानंतर स्थिती नियंत्रणाखाली आली तरी वातावरण तणावपूर्व होते. रात्री उशीरा तीन ग्रामस्थांना अटक करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की रावणफोंड येथील लकाकी आस्थापनाच्या अलीकडे गुजीकर नामक स्थानिक व्यक्तीचे नताशा बार अँड रेस्टॉरंट आहे. तेथे जवळच ऑम्लेट पाव विक्रीचा गाडा आहे. तेथे एक स्थानिक ऑम्लेट खाण्यासाठी आला. त्यावेळी गुंजीकर व त्याच्यात शाब्दीक बाचाबाची उडाली. नंतर गुंजीकर व त्याच्या मुलाने त्या स्थानिकास मारहाण केली. त्या स्थानिकाने गावकर्‍यांना याविषयी जाऊन माहिती दिली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नताशा बारवर चाल केली व बारची प्रचंड तोडफोड केली. त्यांच्या जीप, मोटरसायकल यांना आग लावली.
या प्रकाराची माहिती मिळताच मायणा-कुडतरी व मडगाव पोलिस स्थानकावरून फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला. पोलिसांनी स्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. यावेळी तेथे पोलीस उपअधिक्षक दिनराज गोवेकर, मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, कुडतरीचे पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर उपस्थित होते. ग्रामस्थांनी पोलिसांकडे गुंजीकर पिता-पुत्रांना ताब्यात देण्याची मागणी करून रस्ता रोखला. नंतर पोलिसांवर दगडफेक केली. त्यात चार पोलीस जखमी झाले. उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर हेही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर स्थिती नियंत्रणाखाली आली.