रामलल्लाच्या ललाटावर सूर्यकिरणांचा अभिषेक

0
4

अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभू श्रीरामांचे मंदिर तयार झाल्यानंतर काल पहिली रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता झाल्याचे म्हटले जाते आणि त्यामुळेच अयोध्येत देखील दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा रंगला. दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या ललाटावर सूर्यतिलकाची मोहोर उमटली आहे. चार मिनिटे रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आहे, ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येत गर्दी जमली होती.

काल पहाटे 3.30 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले, सामान्य दिवशी ते सकाळी 6.30 वाजता उघडतात. रात्री 11.30 वाजेपर्यंत म्हणजेच 20 तास भाविकांना दर्शन घेता आले. रामलल्लाची मंगल आरती सुरू होण्याच्या एक तास आधीच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. तसेच भगवान रामाला दुग्धाभिषेकही करण्यात आला. शंखाद्वारे रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला गेला.
दुपारी 12 वाजल्यापासून रामलल्लाचा सूर्यतिलक सुरू झाला. प्राणप्रतिष्ठेनंतरचे हे रामलल्लाचे पहिले सूर्यतिलक होते. दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्तावर 3 मिनिटांसाठी रामलल्लाला सूर्यतिलक करण्यात आला. रामजन्म, म्हणजे ठीक मध्यान्हाच्या वेळी दुपारी 12 वाजता सूर्यकिरणे रामलल्लाच्या ललाटावर पडली. घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे – दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेसनी.

सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली होती. ती रिफ्लेक्ट होऊन ही किरणे पहिल्या आरशावर परावर्तीत केली गेली आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणे रामलल्लाच्या ललाटावर पडली.

सूर्यतिलकाच्या वेळी 9 शुभ योग तयार
रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचा सूर्यतिलक दुपारी 12 वाजता संपन्न झाला. यावेळी केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, कहल आणि रवियोग तयार होणार होते. या 9 शुभ योगांमध्ये रामलल्लाचा सूर्यतिलक पार पडला.